पान:पायवाट (Payvat).pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नाही, बहुधा जमतही नसावे. त्यांच्याबद्दल ही माझी तक्रार फार जुनी आहे. पण खरे म्हणजे ही तक्रार नव्हेच. वा.लं.नी असे सुव्यवस्थित दर्शन निर्माण करावे ही आम्ही त्यांच्यावर लादलेली अपेक्षा आहे. येथे आलोचना आणि समीक्षा हे शब्द विशिष्ट अर्थाने वापरले आहेत. समीक्षेचे काम वाङ्ममयाकडून अपेक्षा कोणत्या याचे सर्वसामान्य विवेचन करण्याचे असते. आलोचना विशिष्ट ललितकृती अगर वाङ्ममयप्रकार याबाबतच्या आपल्या प्रतिक्रिया नोंदवीत असते. समीक्षेचा व आलोचनेचा हा व्यवहार परस्पराश्रयी व परस्परपूरक आहे. यांपैकी तार्किक काटेकोरपणा समीक्षेला लागतो. ही वा.लं.च्या विवेचनातील मूलतः दुबळी जागा आहे. एक उदाहरण म्हणून आपण साध्य-साधनाचा मुद्दा पाहू या.

 वा.लं.च्या मते कलाकृती ही साधन नसून साध्य असते. लगेच एक प्रश्न निर्माण होतो. कलाकृतीचे काम अनुभव साक्षात करणे व तो रसिकापर्यंत नेऊन पोहचविणे हेच आहे ना ? हे जर असेल तर माध्यमाच्या जड रचनेला कलाकृती म्हणावे लागेल आणि ती कलावंताचा अनुभव वाचकापर्यंत नेऊन पोहचविण्याचे साधन होईल. जर आपण काळ आणि अवकाशात असणाऱ्या माध्यमाच्या आधारे मूर्त असणारा पण रसिकांच्या मनात साक्षात होणारा अनुभव हीच कलाकृती मानणार असू , तर मग कालकृती साध्य होईल; पण त्यानंतर कलानिर्मात्याची चर्चा ही कलामीमांसेत आनुषंगिक व अप्रस्तुत होईल. अजून एका पातळीवर साध्य-साधनाचा विचार करावा लागतो. तो म्हणजे काही साधने चटकन उपयोग सांगता येण्याजोगी असतात. उदाहरणार्थ, एखादे औषध. उपयोग-- अमुक रोगावर लागू पडणे हा. पण वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग सांगणे त्या मानाने थोडे दूरचे असते. नीतीचा उपयोग सांगणे त्याहीपेक्षा दूरचे असते. एकूण मानवी जीवनात एकूण कलात्मक व्यवहार काहीच भर टाकीत नाहीत काय ? जर कोणतीही भर मानवी जीवनात कलात्मक व्यवहार टाकीतच नसेल, तर कलात्मक व्यवहाराच्या विनाशाने जीवनाची कोणतीही हानी संभवू नये. मग तो टिकविण्याची गरज भासू नये. कलात्मक व्यवहार जर माणसाच्या माणुसकीसाठी, तिच्या संगोपनासाठी आवश्यक वाटत असेल, तर मग त्याची कारणे सांगितली पाहिजेत, व कलात्मक व्यवहार हे मानवी जीवनाच्या अमुक गरजांचे साधन म्हटले पाहिजे. आणि एकदा कलात्मक व्यवहाराला साधन म्हटल्यावर प्रत्येक कलाकृती त्या संदर्भात थोडीफार साधन ठरणारच; त्याला इलाज नाही. कलाकृतीचा चटकन दिसणारा असा उपयोग नसतो हे म्हणणे निराळे, व कोणत्याच कलाकृतीचा कोणताच उपयोग नसतो हे म्हणणे निराळे. शेवटी माणसाला कलात्मक आस्वादाची भूक लागते ती तरी काय म्हणून ? तशी जर ती लागत नसती तर कलानिर्मिती व कलांचा आस्वाद हा अखंड व्यवहार माणसांच्या जातीत दिसलाच नसता. वा.लं.चा आवडता टीकाकार ऑस्बोर्न हा कलावादी आहे. पण कलावादी असूनसुद्धा कलाकृतींनी व्यक्तीची संवेदनक्षमता विकसित होते हे तो मानतोच. असे मानले म्हणजे लगेच एका मर्यादेत संवेदनाक्षमता विकसित करण्याचे कलाकृती या

वा. ल. कुलकर्णी : एक समीक्षक ५५