पान:पायवाट (Payvat).pdf/54

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मनुष्य इत्यादी) कोल्हटकरांच्यावर लिहितानाही हा विचार वा. ल. करतातच (उदाहरणार्थ विचारसंगती, ललित, बहुजनसुखवाद, तर्कवाद, सौंदर्यवाद इत्यादी). वामन मल्हारांनी घडवलेले अहंगंड, न्यूनगंड असे शब्दही त्यांनी नोंदवलेले आहेत. वस्तुतः ही वाव वाङ्मयीन अभ्यासात येणार नाही, पण वाङ्मयीन आकलनाला तिचा उपयोग आहे. एकोणीसशेसव्वीस साली 'कथासप्तक' प्रकाशित झाले. इथून मराठीत एकेका व्यक्तीचे लघुकथासंग्रह प्रकाशित होण्याचा क्रम सुरू झाला. ही गोष्ट वाङ्मयाच्या इतिहासात महत्त्वाची आहे. 'मासिक मनोरंजना'त आलेल्या कथा कलात्मक वाङ्मय म्हणून महत्त्वाच्या नसतील, पण आजच्या मराठी लघुकथेची वाटचाल पाहण्यासाठी हा अभ्यास महत्त्वाचा आहेच. मराठी वाङ्मयाच्या प्रपंचात 'मासिक मनोरंजना'चे स्थान पाहिलेच पाहिजे. कारण याच मासिकातून एकोणीसशेवीसपर्यंतचे सर्व महत्त्वाचे मराठी काव्य प्रकाशित झाले, यातूनच मराठी लघुकथेने आकार घेतला, इथेच पुस्तकपरीक्षणाला व विनोदाला एक गती मिळाली. दिवाकरांची नाट्यछटा आणि वामन मल्हारांची 'रागिणी' जिथून प्रकाशित झाली, ते 'मासिक मनोरंजन' ही मराठी वाङमयातील एक महत्त्वाची घडामोड आहे. वाङ्मयीन आकलनासाठी वाङ्मय-व्यवहारातील अवाङ्मयीन बावी अभ्यासिण्याचे वा.लं.नी कधी नाकारले नाही.

 या दृष्टीने त्यांनी केलेल्या आणखीही दोन प्रयत्नांच्याकडे लक्ष वेधले पाहिजे. खाडिलकरांवरील ग्रंथात शेवटी त्यांनी एक तक्ता दिलेला आहे. खाडिलकरांच्या पूर्वी. खाडिलकरांच्या प्रत्येक नाटकाच्या बरोबर, आणि खाडिलकरांच्या दोन नाटकांच्या दरम्यान महत्त्वाचे मराठी नाट्यवाङ्मय कोणते होते हे या तक्त्यात नोंदविलेले आहे. खाडिलकरांची नाटके आणि त्यांच्या भोवतालची रंगभूमी समजून घेण्यासाठी हा तक्ता महत्त्वाचा आहे. पण याहीपेक्षा अत्यंत चौरस असे त्यांचे परिशिष्ट वामन मल्हार व त्यांचा काळ हे आहे. या परिशिष्टाची व्याप्ती नीट समजून घेतल्याशिवाय वा.लं.च्या अभ्यासातील चौरसपणा समजणे कठीण जाईल. वामन मल्हार अठराशेन्याऐंशी साली जन्मले. पण वा.लं.च्या नोंदी त्याआधी अठरा वर्षे सुरू होतात. कारण वामन मल्हार समजून घेण्यासाठी हरिभाऊंचा जुना काळ समजणे, हरिभाऊ समजण्यासाठी राजवाडे समजणे आणि वामन मल्हारांवर ज्या घटनेचा फार मोठा ठसा आहे ती घटना--- राष्ट्रीय शिक्षण, हिचे जन्मदाते विजापूरकर समजणे हे महत्त्वाचे आहे. हे परिशिष्ट पाहताना स्पष्टपणे काही गोष्टी कळतात. वामनरावांच्या जन्माआधी मार्क्सचा 'कपिटल' ग्रंथ प्रकाशित झाला होता. पहिला गाजलेला पुनर्विवाह होऊन गेला होता. जॉन स्टुअर्ट मिलचा मृत्यू झाला होता. निर्णयसागर छापखाना स्थापन झालेला होता. थिऑसफिकल सोसायटीची स्थापना व वासुदेव बळवंतांचे बंड या घटना तर वामन मल्हारांच्या जन्माच्या ऐन आधीच्या. वामन मल्हारांचा जन्म व नाथमाधवांचा जन्म एकाच वर्षीचा. याच वर्षी दादोबा वारले, चिपळूणकरही वारले. वामन मल्हार दोन वर्षांचे झाले आणि केशवसुतांची पहिली कविता प्रकाशित झाली, केतकर जन्माला आले, इंग्लंडमध्ये फेबियन सोसायटी स्थापन झाली.

४८ पायवाट