पान:पायवाट (Payvat).pdf/53

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 वा.लं.च्या या नम्रतेबरोबरच त्यांचा व्यासंगही आपण समजून घेतला पाहिजे. याबाबतीत वा.लं.च्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर सर्वात मोठा अन्याय केला आहे. वा.लं.च्या विद्यार्थ्यांत असा एक ग्रह आढळतो की वाङ्मयीन अभ्यासाशिवाय इतर कशाचेही महत्त्व वा.ल. मनण्यास तयार नाहीत. ही भूमिका निर्माण होण्याची पुष्कळशी जबाबदारी स्वतः वा.लं.ची आहे, अशी माझी नम्र समजूत आहे. खरे म्हणजे वा.ल. हे समीक्षेपेक्षा ललित वाङ्मय जास्त महत्त्वाचे मानतात. समीक्षेवर माझे प्रेम आहे पण वाङ्मयावर त्यापेक्षा अधिक आहे, किंबहुना वाङ्मयावर प्रेम आहे म्हणूनच समीक्षेवर प्रेम आहे हे वा.ल. आवर्जून पुनः पुन्हा सांगतात. पण वाङ्मयापेक्षाही जीवनावर त्यांचे प्रेम अधिक आहे. किंबहुना जीवनाविषयी त्यांना अखंड कुतूहल आहे. म्हणूनच त्यांना वाङ्मयाविषयीसुद्धा कुतूहल आहे, ही गोष्ट त्यांच्या विद्यार्थ्यांच्या नीटशी लक्षात येत नाही. जीवनाचा एकूण व्यवहार म्हणजे फक्त वाङ्मयीन व्यवहार नव्हे, इतर व्यवहारही तितकाच मोलाचा व महत्त्वाचा आहे यावर वा.लं.ची श्रद्धा आहे. या श्रद्धेतून व्याकरणात मुरलेल्या मोडकांचा विषय निघाला की वा.ल. उत्साहाने बोलू लागतात. ज्ञानेश्वरीच्या पाठ-चिकित्सेचा विषय निघाला की आपले मित्र मंगरूळकर यांच्याविषयी ते उत्साहाने बोलतात. सार्वजनिक किंवा राजकीय जीवनातील चारित्र्याचा प्रश्न उपस्थित झाला म्हणजे ते एस. एम. जोशींच्याविषयी तितक्याच उत्साहाने बोलतात, ही गोष्ट वा.लं.च्या विद्यार्थ्यांच्या नीटशी ध्यानात आलेली दिसत नाही.

 वाङ्मयाचे मूल्यमापन आणि आकलन यांत मराठी समीक्षक पुष्कळ वेळा गोंधळ करतात. वा.लं.नी या दोन बाबी भिन्न आहेत याची जाणीव सतत ठेवली आहे. वाङ्मयाचे यथार्थ आकलन व्हायचे असेल तर कलाज्ञानाइतकीच समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राजकारण इत्यादींचीही गरज आहे, ही गोष्ट वा.लं.नी कधी नाकारली नाही (पाहा 'वाङ्मयीन टीपा आणि टिप्यगी, पृष्ठ ११). तथापि आकलनासाठी या बाबींचे महत्त्व मान्य करूनही वाङ्मयीन मूल्यमापनास मात्र वाङ्मयीन मूल्यांचाच आग्रह वा.लं.नी सतत धरला आहे. खरोखरी यात विसंगती नाही; असेल तर महत्त्वाची सुसंगतीच आहे. ललित वाङ्मयात तुमचा स्पर्श समग्र जीवनाशी, त्याच्या सर्व अंगांशी सामग्र्याने होतो. ही सारी अंगे समजून घेणे आवश्यकच असते. पण हे समजून घेणे म्हणजे मूल्यमापन नव्हे. वाङ्मयाचे आकलन निराळे आणि मूल्यमापन निराळे. समीक्षेला मात्र दोन्ही बाबी नीट पाहिजेत. ते पाहण्याची तयारी वा.ल. नेहमी दाखवतात. अव्वल इंग्रजीच्यानंतर मराठी वाङ्मय नवा आकार धारण करीत गेले, या क्रियेबरोबरच मराठी भाषाही नव्याने घडत गेली, ही गोष्ट वा.लं.ना सदैव जाणवत असते. नवीन आशय व्यक्त करण्यासाठी सतत मराठीला नवनवे शब्द घडावे लागले. या घडविल्या गेलेल्या नव्या शब्दांच्याकडे वा.ल. लक्ष वेधतातच. मग ते केळकरांवर लिहीत असोत किंवा चिपळूणकरांवर लिहीत असोत. उदाहरणार्थ, चिपळूणकरांचे विविध वाक्प्रचार सांगतानाच त्यांनी घडविलेले नवे मराठी शब्दही वा. ल. नोंदवितात ( वस्त्वैक्य, एकराजक, वाताकर्षक यंत्र, व्यक्तिभूत

वा. ल. कुलकर्णी : एक समीक्षक ४७