पान:पायवाट (Payvat).pdf/51

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नाही. प्राचीन रसचर्चा समजावून सांगणे, वाङ्मयीन वाद विवरून सांगणे या बाबी आपण बाजूला ठेवू , व जे वाङ्मय मराठीत निर्माण होत होते त्याच्या मूल्यमापनाची कसोशी कुठे दिसते हे जर आपण तपासून पाहू लागलो, तर वर उल्लेखिलेल्या टीकाकारांत वा.लं.खेरीज दुसरे नाव आढळणार नाही. केशवसुतांनी केलेल्या क्रांतीचा तपशीलवार विचार करणारे आणि कलेच्या शाश्वत मूल्यांचा शोध घेऊ इच्छिणारे सारेजण मढेकरांचा उदय झाला तेव्हा त्यांना समजून घेण्यात थिटे पडले. एकोणीसशेपंचेचाळीसच्या पूर्वीचे सारे वाङ्मय क्रमाने नकली व दिखाऊ होत आले आहे हे जाणणारा व वाङ्मयाला कवितेत अगर कथेत जे नवे धुमारे फुटतात त्यांचे स्वरूप समजून घेऊन त्यांचे स्वागत करणारा टीकाकार या दृष्टीने आपण फक्त वा.लं.च्याकडेच पाहू शकतो. म्हणून जर आज मराठी वाङ्मय-समालोचनात बदल दिसत असेल, तर तो वा.लं.चा परिणाम मानावा लागतो. पण ही गोष्ट आज फारशी जाणवत नाही. याचे खरे कारण हे आहे की, वा.लं.ची मूल्यमापने आता पूर्ण अंगवळणी पडली आहेत, व ती त्यांनी एकेकाळी प्रवाहाच्या विरोधी जाऊन वाङ्मयावरील गाढ प्रेमामुळे धैर्य धरून केली आहेत हे आता जाणवतही नाही. श्रीपाद कृष्णांचे असेच झाले होते. 'फडके : व्यक्ती आणि वाङ्ममय' लिहिणाऱ्या मा. का. देशपांड्यांना, स्वतः फडक्यांना, 'मुक्तात्मापासून प्रमद्वरेपर्यंत ' लिहिणाऱ्या वाळिंब्यांना, गडकऱ्यांवर लिहिणाऱ्या खांडेकरांना अगर केशवसुतांवर लिहिणाऱ्या जोगांना आपण कोल्हटकरयुगाचे पाईक आहोत, याची जाणीव असण्याचा संभव फार कमी. वर उल्लेखिलेल्या ग्रंथांच्या बाजूला वा.लं.चा 'वामन मल्हार' ठेवून पाहावा, म्हणजे नेमक्या बदलाचे स्वरूप व त्यातले वा.लं.चे स्थान अधिकच डोळ्यांत भरू लागते. पत्तीस-छत्तीस साली लिहू लागलेल्या टीकाकारांत चालू वाङ्मयाचे समालोचन सर्वात विपुल वा.लं.चेच आहे. म्हणून पंचेचाळीसनंतर होणारा बदल हा वाङ्मयाचा विकास आहे, इथे कोंडी फुटत आहे, हे प्रथम जाणण्याचे श्रेयही त्यांचेच आहे.

 माझ्या वरील विवेचनाचा अर्थ वा.ल. हे स्वयंभू परमेश्वर आहेत असा नाही. त्यांच्याही आधी केतकरांचा नव्या पद्धतीने विचार वामन मल्हार जोश्यांनी केलेला आहेच. कथानके न पाहता मानवी स्वभाव व जीवन आकलन करण्याच्या पद्धतीचे टप्पे पाडून वामन मल्हारांनी मराठी कादंबरीच्या विकासात केतकरांचे स्थान पाहण्याचा प्रयत्न केला आहे. केतकरांच्या वाङ्मयीन प्रकृतीत असणाऱ्या सामर्थ्याचा व मूलभूत उणीवांचा शोध घेतला आहे. पण असा प्रयत्न वामनराव एकदाच करू शकले. वामन मल्हारांचा हा वारसा वृद्धिंगत करून रुजविण्याचे कार्य वा.लं.नाच करावे लागले. वामन मल्हारांच्या अनेक कल्पनांचा विस्तार वा.लं.च्यामध्ये दिसतो. काहीवेळा तर वामन मल्हारांना जे ओबडधोबडपणे जाणवले, पण रेखीवपणे मांडता आले नाही- त्या कल्पनेचा अधिक चांगला विकास वा.लं.च्या लिखाणात सापडतो. एक उदाहरण म्हणून आपण काव्यानंदाच्या प्रश्नाकडे पाहू. काव्यानंद सविकल्प समाधीमुळे होतो ही तात्यासाहेब केळकरांची भूमिका होती. वामनरावांच्या शब्दांत सांगायचे तर ते समाधीला जलसमाधी देऊ इच्छीत

वा. ल. कुलकर्णी : एक समीक्षक ४५