पान:पायवाट (Payvat).pdf/50

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रमाण थोडे कमीच होते, उरलेल्या मंडळींत रसिकता जास्त होती. पण यापुढील मराठी टीका जे वळण गिरवीत राहिली, ते कोल्हटकरांचे होते. तात्यासाहेब केळकर तर सोडाच, पुष्कळदा वामन मल्हारही याच पद्धतीने समीक्षण करतात. फडके, खांडेकर, माडखोलकर यांची समीक्षेची पद्धती मूलतः हीच आहे. फडकेप्रणीत तंत्रवादातील गुंतागुंत, निरगाठ, उकल हे साचे मराठीपुरते तरी क्रमाने कोल्हटकरांपासून उत्क्रांत झालेले दाखविता येतात.

 आजची मराठी समीक्षा यापेक्षा निराळी झाली आहे. तुम्ही कलावादी असा की जीवनवादी असा, आता लेखकांच्या अनुभव घेण्याच्या व तो व्यक्त करण्याच्या पद्धतीविषयी शोध घेणे अधिक महत्त्वाचे मानले जाऊ लागले आहे. मानवी जीवनातील वास्तवाचे व सत्याचे आकलन, अवलोकन आणि त्याची स्वयंपूर्ण आकृती म्हणून पुनर्निर्मिती तपासली जाऊ लागली आहे. कलाकृतीकडे एक संपूर्ण आकृती म्हणून पाहण्याचा, तिच्यात व्यक्त झालेल्या अनुभवातील विविध परिमाणे हुडकण्याचा प्रयत्न मराठी टीका करीत आहे. कथानकाच्या मांडणीच्या विचारापासून व कथानकाच्या प्रदीर्घ तपासणीपासून मराठी टीका कुणी सोडवली? तिला वाङ्मयीन टीकेचे व आस्वादाचे अधिक सुजाण स्वरूप कुणी दिले ? ते कुणीतरी दिले असले पाहिजे. कारण समीक्षेत हा बदल डोळ्यांत भरण्याइतका जाणवू लागला आहे. या बदलाचे सर्वात मोठे श्रेय वा.ल. यांचे आहे, अशी माझी समजूत आहे व म्हणून वा.लं.चे स्थान मी युगप्रवर्तक मराठी टीकाकारांत मानतो. त्यांच्याशी माझे मतभेद नाहीत असे नाही. त्यांच्या मर्यादा मला जाणवत नाहीत असेही नाही. पण त्यांचे सामर्थ्यही मला जाणवत आले आहे.

 वा.लं.नी एकोणीसशेपस्तीस-छत्तीस पासून लिहिण्यास आरंभ केला. याआधी थोडेच दिवस श्रीपाद कृष्ण वारलेले होते. वा.ल. ज्या वेळी लिहू लागले, त्यावेळच्या प्रथितयश टीकाकारांत तात्यासाहेब केळकर, वामन मल्हार जोशी यांचा समावेश होत असे. जोग, खांडेकर, माडखोलकर, पेंडसे, पु. ल. देशपांडे, प्रभाकर पाध्ये आणि क्षीरसागर हे टीकाकारही या काळात लिहीतच होते. बेडेकर, वाळिंबे, मढेकर यांचे महत्त्वाचे लिखाण बरेच नंतरचे आहे. समीक्षेत आपणास आज जो बदल दिसतो, त्याला यांपैकी जबाबदार असणारा टीकाकार कोण दिसतो हा माझ्यासमोर प्रश्न आहे. हाच प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने आपण मांडू शकतो. फडके, खांडेकर, माडखोलकर, दिघे, कवठेकर, ठोकळ यांच्या कादंबऱ्यांनी हा कालखंड गाजवला होता. हे सारे वाङमय तांत्रिक, दिखाऊ, खोटे व निर्जीव आहे हा साक्षात्कार वरील टीकाकारांत कितीजणांना झाला ? रविकिरण मंडळाचे व त्यानंतरचे काव्य मोठ्या प्रमाणात आवर्तात सापडलेले आहे ही जाणीव कुणाला झाली ? जोग व वाळिंबे या कालखंडात यशवंतांच्या 'जयमंगले'ला नितान्त रमणीय म्हणत होते. क्षीरसागरांना तर माधव ज्युलियन व गिरीश आजही मढेकरांपेक्षा श्रेष्ठ वाटतात. रविकिरण मंडळाने मराठी कवितेचा विकास केला, अशी या काळात त्यांची भूमिका होती. प्रत्यक्ष वाङ्मयीन मूल्यमापन मढेकर व प्रभाकर पाध्ये यांनी फारसे केलेले

४४ पायवाट