पान:पायवाट (Payvat).pdf/46

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

निर्जीव व पोकळ बडेजावाचे कलात्मक चित्रण करणारा श्रेष्ठ प्रतिभावंत जन्माला येऊ शकतो. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात कोंडीत सापडलेल्या, खुरट्या, मरगळलेल्या जीवनाचे उत्तम चित्रण करूनच हरिभाऊ श्रेष्ठ कादंबरीकार ठरले. ही वाङ्मयीन महात्मता कोठून येते या प्रश्नाचे जीवनसंबद्ध उत्तर जीवनवादी समीक्षेने दिले पाहिजे. गोडसे याची भूमिका असे उत्तर देत नाही, हे नमूद करणे भाग आहे.

 मानवी समाजात आढळात येणारी कोणतीही वस्तू आणि निर्मिती ज्याला जशी वाटेल तशी तो तपासणारच. याबाबत कोणी बंधन घालू नये. घातले तर ते कुणी मान्य करणार नाही. शेवटी भासाच्या नाटकातील प्राकृत अश्वघोषापेक्षा उत्तरकालीन आहे की नाही हाही एक अभ्यासाचा विषय आहे, व तो महत्त्वाचा आहे. ज्ञानेश्वरीच्या अभ्यासातून यादवकालीन समाजस्थितीवर प्रकाश पाडणारे असे जर काही उपलब्ध होत असेल तर त्या अभ्यासाला महत्त्व आहे. प्रत्येक प्रकारच्या अभ्यासाचे महत्त्व मान्य करूनसुद्धा कलाकृतीचा कलाकृती म्हणून अभ्यास ज्याला म्हणतात तो हा नव्हे, हे स्पष्ट जाणून घेतले पाहिजे. छदंतजातकातील छदंताची कथा क्रमाने काही अंशाने बदलत जाते. भरहूतनंतर छदंत आकाराने मोठा दाखविला जातो. त्याच्यावर छत्र-चामरे ढाळली जातात. पुढच्या काळात सुळे कापू देण्यासाठी तो गुडवे मोडून बसलेला दाखविण्यात येतो. तिसऱ्या शतकातील अजिंठा चित्रात त्याच्या दातावर स्तूप उभारलेला दाखविला जातो. या वेळेपर्यंत सर्वत्र छदंतांचे सुळे करवतीने कापले गेलेले आहेत. सहाव्या शतकातील चित्रात मात्र छदंत आपले सुळे उपटून देतो हे दाखविले आहे. एकाच कथेची अंग-प्रत्यंगे क्रमाक्रमाने बदलत, विकसत जातात, हा अभ्यास महत्त्वाचा आहे हे मान्य करता येईल. इतरही कथांत असे बदल घडत जातात. मुळात रुक्मिणीकथेत रुक्मिणीने पत्रिका पाठविल्याचा उल्लेख नाही. पुढे तो आला आहे. मूळ कथेतील देवी इंद्राणी आहे. पुढच्या काळात तिची अंबिका होते. मुळात रुक्मिणीहरण लग्नाच्या आदल्या दिवशी झालेले आहे. पुढच्या काळात ते लनाच्या दिवशी दाखवितात. रुक्मिणीच्या कथेतील छोट्या-मोठ्या बदलाचा हा अभ्यासही महत्त्वाचा आहे. पण वरील दोन्ही प्रकारचे अभ्यास ललित कलांच्या कला म्हणून होणाऱ्या समीक्षांचे भाग नाहीत. म्हणूनच या परीक्षगाच्या अगदी आरंभी गोडसे यांचा प्रयत्न लक्ष्यवेधी म्हटला आहे. (या लिखाणाने समीक्षणात्मक वाङमयात मोलाची भर पडली आहे असे म्हणण्याचे टाळले आहे.) गोडसे यांच्या विवेचनामुळे विविध कलाप्रकारांचा समुच्चयाने विचार करणाऱ्या विवेचनात मोलाची भर पडली आहे हे मान्य केलेच पाहिजे. असे प्रयत्न सर्व कलांचे परस्परांशी असणारे संबंध अधिक स्पष्ट करण्यास उपकारक होतील अशी माझी खात्री आहे. आलोचना, ऑक्टोबर १९६५

आलोचना, ऑक्टोबर १९६५

४० पायवाट