पान:पायवाट (Payvat).pdf/43

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संस्कृती जरी घेतली तरी ती अशा श्रद्धांनी गच्च भरलेली असते. या श्रद्धांतून सकत निर्माण होतात आणि पुढे हजारो वर्षे हे संकेत चालत राहतात. जमिनीवर पावसाळ्यात गवत उगवते, हे पाहिल्यानंतर त्या जुन्या संस्कृतीने जमीन स्त्री ठरविली आणि ही स्त्रा असणारी जमीन कोणत्यातरी पुरुषाच्या सहवासात यायला पाहिजे म्हणून 'आकाश' या धरित्रीचा पती ठरले. द्यौ हा वृषभ असून मेघांच्या गडगडाटाच्या रूपाने तो हवरता व या हंबरण्याने पृथ्वी गाभण होते अशी कल्पना ऋग्वेदात आली आहे. ऋग्वेदापेक्षाही जुन्या काळी मोहोंजोदारो संस्कृतीत श्रद्धा, धर्म, संकेत या बाबी आहेतच. ज्यांनी अजून घरे बांधून राहण्याला आरंभ केला नाही अशा भटक्या, रानटी टोळ्यांच्यामध्ये श्रद्धा आहेतच. या सर्व श्रद्धांनी व संकेतांनी मानवी संस्कृती बनत असते, वाढत असते. यांनी व्यापलेल्या जीवनातच कलांचे व वाङ्मयाचे उदय असतात. शेवटी काल्पनिक देवदेवांच्या ऐहिक लाभासाठी केलेल्या · स्तुतिस्तोत्रांतूनच वाङ्मय पहिला आकार धारण करते. आदिमानवाने आपल्या गुहांतून केलेली प्राण्यांची रेखाटने ही खरोखरी यातुसंबद्ध आहेत. या यातुसंबद्ध रेखाटनांतून शिल्पांचा व चित्रांचा, आणि धर्मसंबद्ध, विधिसंबद्ध मंत्रामधून वाङ्मयाचा उदय होतो. काळ बदलत जातो तसतसे हे काल्पनिक विश्व एका अंगाने क्रमाने बदलतही असते, व दुसऱ्या अंगाने नवनव्या संकेतांची भर पडून समृद्धही होत असते. या घडामोडीत काही जुने संकेत कायमचे बदलतात. मूळ वैदिक उल्लेखाप्रमाणे नीरक्षीरविवेक हा क्रौंच पक्ष्याचा गुण आहे. पुढे चालून तो हंसाचा गुण ठरला. ब्राह्मण-वाङ्मयात हंसांच्या पाठी निळसर असल्याचे उल्लेख आहेत. पुढे चालून हंस हे पूर्ण शुभ्र मानले गेले. हे बदल घडतात त्याप्रमाणे नवनवे संकेत निर्माण होतात. अथर्ववेदात राजाचा अभिषेक आला आहे, पण राजसिंहासनाचा उल्लेख नाही. यानंतरच्या काळात राजदंड धारण करणे या कल्पनेचे महत्त्व पुढे आले. जुन्या वाङ्मयात असणारा गणपती म्हणजे हत्तीचे तोंड असणारा आजचा गणपती नव्हे. हे सर्व संकेत विकसित होतात, बदलतात, मागे पडतात, नवे संकेत बनतात, ही क्रिया चालू असते. याचे पडसाद वाङ्मयातही उमटत असतात. किंबहुना अभिजात वाङ्मयाचा जिथून आरंभ होतो त्या सर्व ठिकाणी या संकेतांचा भरघोस व अत्युक्तिपूर्ण वापर पाहावयास सापडतो. आज ज्याला आपण अभिजात संस्कृत वाङ्मयाची काव्यशैली म्हणतो, त्याचे पहिले पहिले धडे रामायण-महाभारतासारख्या पुराणांमधूनच गिरवले गेलेले आहेत. या पुराणांनी प्रतिष्ठित केलेल्या कथा, त्यांनी रुळवून दृढ केलेल्या कल्पना अभिजात वाङ्मयाने उचललेल्या असतात. खरोखरी हे संकेत एखाद्या काव्याचे वाङ्मयीन मूल्य फारसे वाढवीतही नाहीत अगर कमीही करीत नाहीत. चंद्रमुखी, कमलाक्षी, भंगकेशी, कंबुकंठी, पृथुनितंबिनी, घनस्तनी, तनुमध्या, सुश्रोणी, वरारोहा या साऱ्या उल्लेखांनी भरलेले काव्य चांगले अगर वाईट दोन्ही प्रकारचे असू शकेल. या संकेतांचा वापर कसा केला गेला आहे यावर सारे काही अवलंबून राहील. एखाद्या कवितेतील अभिव्यक्ती अशा संकेतांवर आधारलेली असणे ही एक निराळी बाब आहे, आणि ही अभिव्यक्ती जो

पोत ३७