पान:पायवाट (Payvat).pdf/42

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जातो. भरहूत येथेच प्रसेनजिताच्या स्तंभावर तथागताचे प्रतीक म्हणून वटवृक्ष आला आहे. भरहूतच्या छदंत शिल्यात असणारा वटवृक्ष असाच प्रतीकात्मक आहे. छदंत ही कल्पनाच प्रतीकात्मक आहे. कारण तो बोधिसत्त्व असणारा गजश्रेष्ठ असल्याशिवाय सहा सुळे असणारा असणार नाही. मुळात ही कथा बुद्धपूर्वकालीन लोककथा होती हे मान्य केले, तरी बौद्धांनी या कथेचा स्वीकार केल्यानंतर भरहूत शिल्प साकार होते हेही मान्य केले पाहिजे. जो शिकाऱ्याच्याकडून मारला गेला, जो मृत झाल्यावर त्याचे सळे शिकाऱ्याने कापून नेले, तो बोधिसत्त्व कसा असणार ? त्याग, वैराग्य, संयम, बलिदान, दिव्य ज्ञान अशी कोणतीतरी खूण बोधिसत्त्वात असायला पाहिजे. भरहूतचे शिल्प बौद्ध जाणिवांचे शिल्प असल्यामुळे छदंताने सोणुत्तराला क्षमा केली व सुळ्यांचे दान करून आपले बलिदान केले. या कल्पनेखेरीज भरहूत येथे छदंत येऊच शकत नाही. ही कल्पना सोडून देऊन केलेले गोडसे यांचे स्पष्टीकरण मान्य करायचे तर भरहूत शिल्यामागे बौद्ध धर्माची प्रेरणा नाही, हे कबूल केले पाहिजे. एकूण भरहूत पाहता ही कबुली देणे अशक्य आहे. सहाव्या शतकाप्रमाणे छदंत स्वतः सुळे उपटून देवो की तिसऱ्या शतकाप्रमाणे सुळे कापता यावेत म्हणून तो शिकाऱ्यासमोर गुडघे मोडून बसो, अगर भरहतप्रमाणे छदंताचे सुळे तो उभा असतानाच कापले जावोत- सर्वत्र तो बोधिसत्त्व आहे. भरहूत शिल्पातसुद्धा त्याची सोंड लुळी दिसते. याचे कारण जाणूनबुजून शिकाऱ्यासमोर तो सुळे कापू देण्यासाठी सोंड वर उचलून उभा आहे. भरहूतला छदंत आपल्या प्रेयसीएवढाच दाखविला आहे. सांचीला तो थोडासा मोठा व राजचिन्हांकित दिसतो हे खरे. परंतु सर्व ठिकाणी तो जगाचे दुःख स्वतः झेलणारा बोधिसत्त्वच आहे. भरहतला हत्तीकळपांचा नेता, सांचीत आदर्श नेता, अमरावतीत कारुण्यसिंधू असा बोधिसत्त्वाचा विकास होत नसतो. सर्वत्र बोधिसत्त्व दिव्य दृष्टी असणारा महाबलाढ्य, उदारात्मा. कारुण्यसिंधूच असतो. छदंताला हे स्वरूप प्राप्त झाल्याशिवाय बौद्ध-शिल्पकार त्याचे चित्रण करण्यास प्रवृत्तच झाले नसते.

 पुरावा देण्याच्या गोडसे यांच्या पद्धतीशी आणि त्यांनी दिलेल्या पुराव्याशी असणारा माझा मतभेद मी येथवर स्पष्टपणे नोंदविला. याचे कारण असे की गोडसे याच्या लेखनपद्धतीमुळे त्यांनी दिलेला पुरावा त्यांच्या विधानांना दृढ पाठिंबा देणारा आहे असा समज निर्माण होण्याची शक्यता आहे. पण त्यांनी दिलेल्या पुराव्यापेक्षा ज्या गृहीत भूमिकेवरून हा पुरावा देण्यात आला आहे, त्या गृहीत भूमिकेशी माझा प्रमुख मतभेद आहे. गोडसे यांना असे वाटते की जीवन हे मुळात वस्तुनिष्ठ असायला पाहिजे. त्यानंतर ते आदर्श अवस्थेत जाते व नंतर सांकेतिक अवस्थेत जाते. ही भूमिकाच मला मान्य नाही. जसजशा जुन्या काळात आपण जाऊ, तसतशी जीवनाची वीण साधीसुधी व ढोबळ होत गेलेली आपणास दिसते. पण याचा अर्थ या जुन्या काळातील जीवन वस्तुनिष्ठ होते असा करता येत नाही. मानवी संस्कृतीच्या प्रारंभकाळीच काही श्रद्धा निर्माण होतात. या श्रद्धांचा उगम भीतीत असो, गरजेत असोना गैरसमजात असो, पण अगदी आदिमानवाची

३६ पायवाट