Jump to content

पान:पायवाट (Payvat).pdf/4

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
प्रस्तावना


सगळ्याच वाटा कुठेतरी जात असतात, नेत असतात. पायवाट हीसुद्धा त्याला अपवाद नसते. सर्वांच्याप्रमाणेच पायवाटेला काही दिशा असतात. पण राजरस्ते चालण्यासाठी जितके रुळलेले असतात, तितकी पायवाट नसते. पायवाटसुद्धा एखाद्याच्या चालण्याने निर्माण होत नाही. काहीजणांच्या चालण्याने निर्माण होते. पण पायवाटेवरून चालणाऱ्यांची संख्या कमी असते, तिच्यावर वर्दळ कमी असते. पायवाटेची ही सारी ठळक वैशिष्टये लक्षात घेऊन या संग्रहाला 'पायवाट' असे नाव दिलेले आहे.
 सर्वस्वी स्वतंत्र अशी दिशा वाङ्मयसमीक्षेत कुणाला घेता येईलसे वाटत नाही. ती मीही घेतलेली नाही. तसा दावाही नाही. पण दुसऱ्या महायुद्धानंतर मराठी वाङ्मयसमीक्षेत स्वतःला कलावादी म्हणविणाऱ्या समीक्षकांनीच बहुतेक सारे क्षेत्र आपल्या प्रभावाखाली आणलेले आहे. दुसऱ्या महायुद्धापूर्वी परिस्थिती यापेक्षा फार निराळी नव्हती. पण निदान काही मान्यवर समीक्षक जीवनवादी भूमिका स्वीकारणारे होते. दुसऱ्या महायुद्धानंतर हा प्रकार अधिकच क्षीण झाला. कै. दि. के. बेडेकरांच्यासारखे फारच थोडे समीक्षक जीवनवादी समीक्षेच्या मार्गाने वाटचाल करताना दिसतात. माझी वाट ही माझी स्वतःची आहे, या अर्थाने तिला मी पायवाट म्हटलेले नाही. ती कमी वर्दळीची आहे इतकेच.
 या संग्रहात एकूण आठ लेख एकत्र करण्यात आलेले आहेत. त्यांपैकी काही लेखांवरून सुधारणेचा हात फिरलेला आहे. ते जसेच्या तसे पुनर्मुद्रित केलेले नाहीत. यांपैकी- 'केशवसुत—काही प्रतिक्रिया', 'देवलांची शारदा', 'गेल्या दहा वर्षांतील मराठी समीक्षा', 'आजचे मराठी साहित्य सामाजिकदृष्टया पुरेसे प्रक्षोभक आहे काय ? हे व्याख्यानांवर आधारलेले लेख आहेत. वा. ल. कुलकर्णी यांच्यावरील लेख, ते हैद्राबाद साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले, त्या निमित्ताने निघालेल्या विशेषांकासाठी लिहिलेला होता. 'पोत'चे परीक्षण आणि समीक्षेवरील व्याख्यान या दोन्हीलाही कारण माझे मित्र प्रा. वसंत दावतर यांचा आग्रह हे झाले.
  'पोत'मध्ये द. ग. गोडसे यांच्या विवेचनाशी मतभेद दाखविण्यात आला आहे.