पान:पायवाट (Payvat).pdf/32

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


ज्या जीवनाच्या पार्श्वभूमीवर हे काव्य निर्माण झाले ती पार्श्वभूमी बासष्ट हजारांच्या फौजेचा नेता असणाऱ्या शास्तेखानाची बोटे कापणारी व पावणेतीन लाखांच्या आलमगिराच्या फौजेसमोर न नमणारी विजिगीषु पार्श्वभूमी आहे. या विजिगीषु जीवनात व कालखंडात हे बहिरंगप्रधान निर्जीव काव्य बाहेर पडले. ज्ञानेश्वर, नरेंद्र व भास्कर यांचे काव्य अतिरिक्त आलंकारिक आहे. त्यात संकेताचे प्राचुर्य आहे, पण ते निर्जीव नाही. हीच अतिशयोक्ती व सांकेतिकता कालिदासात दाखविता येईल. तो म्हणतो, पार्वतीचे दोन्ही पुष्ट स्तन असे एकमेकाला खेटले की त्यात कमलतंतू मावण्यासही जागा नव्हती. पण म्हणून कुणी कालिदास निर्जीव म्हटला नाही. काव्यगत संकेतांवर आधारलेले काव्य आणि सांकेतिक निर्जीव काव्य या दोन बाबी परस्परभिन्न आहेत हे ओळखण्याची समीक्षकाची जबाबदारी आहे. इंग्रजी वाङ्मयातही हाच प्रकार आहे. क्रॉमवेलची राज्यक्रांती संपल्यानंतर दुसरा चार्ल्स गादीवर येतो. यानंतरच्या काळात जे 'ऑगस्तानियन' युग सुरू होते ते बहिरंगप्रधान, सजावटप्रधान, निर्जीव काव्याचेच युग आहे. पण याच काळात ब्रिटन नव्या विज्ञानाचा पाया भरत होते; आणि स्पेनच्या भीतीतून मुक्त झाल्यामुळे नव्या जोमाने अमेरिकेत वसाहती स्थापन करीत होते; भारताशी व्यापार वाढविण्याच्या उद्योगात होते. वाङ्मयाचे जीवनाशी सांधे असलेच पाहिजेत. पण ते गोडसे समजतात तसे स्थूल असणार नाहीत. विजिगीषु काळात हीन काव्य असण्याचा संभव आहे. उलट ऱ्हासकालीन जीवनात अस्सल कलाकृतींचा उदय होण्याला प्रत्यवाय असण्याचे काहीच कारण नाही. जो भास गोडसे यांच्या कल्पनेप्रमाणे वस्तुनिष्ठ काळात येऊन जातो, त्या भासातही हळवेपणा, आलंकारिकता, नटवेपणा कमी नाही; याची साक्ष ‘अविमारका'तील पाचव्या अंकातील वर्षाऋतूचे वर्णनच देऊ शकेल. 'अविमारका'त कुंतिभोजाच्या राजवाड्याचे वर्णन असे केले आहे : 'रत्नजडित शिलातलावर हंस निजलेले आहेत, वैडूर्य आणि मोती यांची रेती करून ती सर्वत्र पसरली आहे. स्तंभ प्रवालांचे केलेले आहेत. येथल्या रत्नदीपांच्या प्रकाशाने दिव्याची प्रभा निस्तेज झाली आहे." याच नाटकात नायिकेचे स्मरण असे आहे : " वक्षस्थल स्तनभारामुळे जड, जघनभारामुळे भारावलेली तनु, मुख व नयन सुंदर, लाल तोंडल्याप्रमाणे अधर, जर भयभीत अशा अवस्थेतदेखील नेत्रांचे पात्र करून पान करण्याजोगे ते सौंदर्य आहे, तर सुरतातल्या निरनिराळ्या विलासांत त्याची शोभा किती वाढेल ?" भासाच्या या वर्णनातील आलंकारिकता आणि सांकेतिकता पाहून भास हा ऱ्हासकालातील कवी मानावा काय? ज्ञानेश्वर व व्यास यांच्या तुलनेच्या ओघात, सिंह हत्तींची गंडस्थळे फोडून त्यांतील मोती भक्षण करतो या संकेताची चर्चा आलेली आहे. प्रत्यक्षात ज्या जंगलात हत्ती राहतात आणि ज्या जंगलात सिंह राहतात ती जंगले भिन्न प्रकारची आहेत. हे दोन पशू निसर्गतः एकाच प्रकारच्या जंगलात राहणारे नाहीत आणि कदाचित जर सिंह व हत्ती यांची समोरासमोर भेट झाली, तर हत्तीवर चाल करून जाण्याची सिंह हिम्मत करील असेही नाही. तरीसुद्धा 'रिपु-गज-पंचानन' हा संकेत प्राचीन काळापासून चालत आलेला आहे.

२६ पायवाट