पान:पायवाट (Payvat).pdf/31

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


बडेजाव माजविणे ही काही तेराव्या शतकाची मिरासदारी नव्हे. गोडशांच्या वस्तुनिष्ठ काळातही अशा अतिरिक्त, अनावश्यक व कृत्रिम बडेजावांची उदाहरणे दाखविता येतील. त्या दृष्टीने 'ललितविस्तरा'तील बुद्धाचे चरित्र पाहण्याजोगे आहे. भगवान श्रावस्ती आपले बारा हजार भिक्षू व बत्तीस हजार बोधिसत्त्व यांच्यासह जैतवनात गेले. इथे त्यांनी या श्रोतृवर्गाला बुद्धाचे चरित्र ऐकवले आहे. बुद्धाने ज्या कुळात जन्म घ्यायचा त्या कुळात चौसष्ट गुण असले पाहिजेत, असे कुळ शाक्यांचे होते. जिच्या पोटी जन्म घ्यायचा त्या स्त्रीत बत्तीस गुण हवेत; अशी स्त्री मायादेवी होती. या सुरात 'ललितविस्तरा'तील बुद्धाची कहाणी आहे. ज्या शाळेत बुद्ध शिकायला जाई त्या प्राथमिक शाळेत दहा हजार मुले होती. बुद्धाने मेलेला हत्ती पायाच्या अंगठ्यात धरून फेकला तो सात तट, सात खंदक ओलांडून दोन मैल पलीकडे जाऊन पडला. बुद्धाला पत्नीसह चौऱ्यांशी हजार कन्या अर्पण करण्यात आल्या. तप करताना बुद्ध इतका कृश झाला होता की, वाऱ्यावर उडत त्याच्या कानात गेलेले तृणबीज नाकावाटे बाहेर पडत असे. ही सारी रचना अतिशयोक्तिपूर्ण, अनावश्यक डामडौलाची, खोटी व कृत्रिम नव्हे काय ? याच्याशी शातवाहनाच्या गाथेतील गाथाही तुलना करून पाहता येतील. दोनशे अठावन्नावी गाथा अशी आहे : " हत्तीच्या छाव्याच्या गंडस्थळाप्रमाणे मोठे, उंच व अंतर नसलेले स्तन असल्यामुळे तिला नीट श्वासोच्छ्वासही घेता येत नाही. मग ती भरभर चालणार कशी?" इसवी सनाच्या एखादे शतक पूर्वी ही सांकेतिक, अतिशयोक्तिपूर्ण काव्यशैली निर्माण झालेली आहे. ही शैली वाटल्यास अतिरंजित, कृत्रिम व नटवी म्हणून आपण नापसंत ठरवू शकतो. रामायणात या शैलीचे उतारे शेकड्यांनी आढळतात. पण या काव्यशैलीचा संबंध रुद्धगतिक, पोकळ व निर्जीव झालेल्या जीवनाशी आहे हे आपण कसे सिद्ध करणार? हे सिद्ध करण्यासाठी इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून तेराव्या शतकापर्यंतचा भारताचा इतिहास हा सततचा अधःपाताचा इतिहास आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी आपण स्वीकारली पाहिजे. याच कालखंडात गुप्त, वाकाटक व चालुक्य, राष्ट्रकूट यांचे वैभवशाली काळ येऊन जातात. वर दिलेल्या विवेचनाच्या प्रकाशात एक गोष्ट स्पष्ट होईल की ज्ञानेश्वरीतील अतिआलंकारिक, अतिशयोक्त असे जे वर्णन आहे त्याचा जीवनाच्या ऱ्हासाशी काही संबंध नाही. मूळ म्हणजे शैलीतील अलंकारप्राधान्य, संकेतप्राधान्य आणि काव्यातील निर्जीवपणा या दोन बाबी एक नव्हत. मराठीतील निर्जीव काव्य पंडितकवींच्या रूपाने उभे आहे. ऐन मराठ्यांचे राज्य निर्माण होत असताना, नव्या उमेदीने महाराष्ट्र पराक्रम गाजवीत असताना हे बहिरंगप्रधान निर्जीव काव्य जन्माला येते. ज्या काळात नुकताच शिवाजीने राज्यनिर्मितीचा उद्योग आरंभिला होता, त्या काळात सामराज येतो. शिवाजीचा राज्याभिषेक आणि विठ्ठल बीडकरांचे 'रुक्मिणीस्वयंवर' समकालीन आहेत. शिवाजीचा कर्नाटक-दिग्विजय आणि नागेशाचे 'सीतास्वयंवर' समकालीन आहेत. ज्या वर्षी औरंगजेबाच्या मृत्यूनंतरची भांडाभांड पूर्ण होऊन बाळाजी विश्वनाथाने सूत्रे हाती घेतली, त्याला समकालीन श्रीधराचा 'पांडवप्रताप' आहे.

पोत २५