पान:पायवाट (Payvat).pdf/30

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


पण असे जरी असले तरी ज्या कालखंडाला गोडसे वस्तुनिष्ठ कालखंड म्हणतात, त्या काळात भगवद्गीता महाभारताचा भाग होती इतके आपण मान्य करू शकू. गीतेच्या पहिल्या एकोणीस श्लोकांत अस्त्रविद्येचा उल्लेख नाही हे मान्य केले तरी गोडसे समजतात त्याप्रमाणे पांडवांचे सैन्य 'ब्रज' नावाचा व्यूह करून उभे राहिले याचाही गीतेत उल्लेख नाही. द्रोणाचार्य हे विद्या शिकण्यासाठी केलेले कौरव-पांडवांचे उपनयन-गुरू नव्हत. तसे उपनयन-गुरू कृपाचार्य होते. कौरवपांडवांच्या अध्ययनाला आरंभ कृपाचार्यांच्या नेतृत्वाखाली होतो. द्रोणाचार्यांचा गुरू म्हणून स्वीकार यानंतरच्या काळातील आहे. यादवकालीन जीवन पोकळ, डामडौलाचे बनलेले होते, त्यांच्या शिलालेखांतही अतिशयोक्तीचा गर्वोद्धत सूर ऐकू येतो अशी गोडशांची तक्रार आहे. यादवांच्या शिलालेखांतील अतिशयोक्तिपूर्ण भाषेत स्वतःचा बडेजाव सांगण्याची प्रथा आहे ही गोष्ट खरी. पण ही प्रथा केवळ यादवांत नाही. ती त्यांच्यापूर्वीच्या राष्ट्रऋटांच्या शिलालेखांतही आहे. त्यापूर्वीच्या चालुक्यांच्या शिलालेखांतही स्वतःचा असाच बडेजाव माजवलेला आढळून येतो. सत्याश्रय पुलकेशीच्या शिलालेखातील एका श्लोकाचा अर्थ असा आहे : "चोलांना जिंकण्याचा प्रयत्न करीत असता कावेरीच्या प्रवाहात तेथील शफरी विलोल नेत्रांप्रमाणे दिसत होत्या. ज्यांच्या गंडस्थलांतून मद गळत होता असे त्यांचे हत्ती नदीत उभे असताना धरणाप्रमाणे दिसत होते. ते जणू काय नदीला समद्राकडे जाण्याची बंदीच करीत होते." अशा चोलांना चालुक्यांनी जिंकले. याआधीचा एक श्लोक असा आहे : " त्याच्या प्रतापामुळे वश झालेले लाट, मालव, गुर्जर इत्यादी राजे शरण आलेल्यांनी कसे वागावे याचे वस्तुपाठ देणारे जण आचार्यच झाले.” ही आत्मप्रशंसा व आत्मप्रौढी करण्याची सवय मागे नेत नेत चेदीखारवेलाच्या हस्तिगुंफा-शिलालेखापर्यंत मागे नेता येईल. गोडसे समजतात त्याप्रमाणे शिलालेखांतील आत्मप्रशंसा व बडेजाव ही केवळ यादवकाळाची खूण नाही. ती गोडसे यांच्या वस्तुनिष्ठ अवस्थेच्या काळात निर्माण झालेली व क्रमाने पुढे चालत आलेली अशी एक परंपरा आहे. तीन हजार घोडेस्वार व दोन हजार पायदळ घेऊन काराचा सुभेदार अल्लाउद्दीन खिलजी याने दक्षिणेत यावे व यादवांचे सारे वैभव आणि यश धुळीला मिळवावे या घटनेची चीड गोडसे यांना आली आहे. कुणालाही अशा दुबळ्या राजवटीची चीड आल्याविना राहणार नाही. या कर्तृत्वशून्य राजांच्या शिलालेखांत अगर ताम्रपटांत आत्मप्रौढी पाहिल्यावर त्यांच्याविषयी तिरस्कार वाटणे ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. पण स्वाभाविक प्रतिक्रियेच्या आहारी जाऊन इतिहास विसरता येणार नाही. यादव-होयसाळांच्या पाडावानंतर पन्नास वर्षे उलटण्याच्या आधी विजयनगरच्या साम्राज्याची स्थापना झाली आहे. हे साम्राज्य मुस्लिम राजवटीशी अखंड झगडा देत निर्माण झाले, वाढले व दोनशे वर्षे टिकून इसवी सन १५६५ ला कोसळले. एक तर यादवांच्या काळापेक्षा निराळ्या अशा नव्या जिवंत जाणिवा विजयनगरच्यामागे दाखविल्या पहिजेत, किंवा यादव-होयसाळांचा पराजय हा नालायक राजवटीचा पराजय मानून थांवले पाहिजे. इसवी सन ११९२ पूर्वी निर्माण न झालेली अशी एक प्रेरणा विजयनगरच्या साम्राज्यस्थापनेपूर्वी दाखविता येणे कठीण आहे.

२४ पायवाट