Jump to content

पान:पायवाट (Payvat).pdf/29

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कल्पनेप्रमाणे मोहेंजोदारोनंतर भारतीय कलांना ही वस्तुरूप अवस्था इ. स. पू. दुसऱ्या शतकात आली. भारताचे वाङ्मय आणि भरहूतचे शिल्प त्यांना या अवस्थेतील वाटते. यापुढील अवस्था म्हणजे आदर्श अवस्था. आदर्श अवस्थेत वस्तू जशा आहेत तशा दाखविण्यावर भर असतो. त्यांच्या कल्पनेप्रमाणे इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून तिसऱ्या शतकापर्यंत भारतीय कलांची ही अवस्था आहे. सांची व अमरावती येथील शिल्प व अजिंठ्याच्या दहाव्या लेण्यातील चित्रे हा आविष्कार या अवस्थेतील आहे. यानंतर तिसरी संकेत-अवस्था सुरू होते. ही संकेत-अवस्था इसवी सनाच्या सहाव्या शतकात परिपक्क होते. या अवस्थेत अजिंठ्यातील सतराव्या लेण्यातील चित्रे आहेत. यापुढे झपाट्याने यंत्रणेचे विलगीकरण वाढत जाते. या कालखंडात तंत्राचा बडेजाव असतो. नटण्या-मुरडण्यात कलावंतिणीची हौस असते, अतिरिक्त अतिशयोक्ती व अनावश्यक विस्तार असतो. कृत्रिम, नटवे, भावविवश व निर्जीव असे कलेचे स्वरूप या कालखंडात दिसू लागते. जीवनाचा क्रमही असाच असतो. पहिल्या अवस्थेतील जीवन निकोप, ऐहिक समृद्धीचा आस्वाद घेणारे, संपन्न असे असते. दुसऱ्या अवस्थेतील जीवन आदर्शाना महत्त्व देणारे असते. तिसऱ्या अवस्थेतील जीवन सांकेतिक, निर्जीव व पोकळ डामडौलाचे असते. अशा या जीवनाच्या जाणिवा कलाकृतींमधून आविष्कृत होत असतात. गोडसे यांनी आपला मुद्दा पुराव्यांनी सिद्ध केलेला आहे. स्थूलपणे ही भूमिका जसे जीवन तशी कला, जे जीवनाचे मूल्य आणि जो त्याचा स्तर तेच त्या कलेचे मूल्य व तिचा स्तर असे सांगणारी आहे. आपले मत सिद्ध करण्याइतका पुरावा खरोखरी गोडसे यांनी दिलेला आहे का ?-- हा पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे.

 त्यांच्या विवेचनाच्या तपासणीला वाङ्मयापासून सुरुवात करणे अधिक इष्ट आहे. 'पोत' या पुस्तकाच्या चौथ्या प्रकरणात प्रामुख्याने ही तुलना आली आहे. एकीकडे वस्तुरूप अवस्थेतील भगवद्गीता आणि दुसरीकडे सांकेतिक अवस्थेतील ज्ञानेश्वरी अशी ही तुलना आहे. ही तुलना गीतेच्या पहिल्या अध्यायातील पहिले एकोणीस श्लोक व त्यावरील ज्ञानेश्वरांचे भाष्य यापुरती मर्यादित आहे. व्यासांच्या वर्णनात वस्तुनिष्ठ एकसंधपणा आढळतो. ज्ञानेश्वरांच्या वर्णनात तो आढळत नाही. कोसळू लागलेल्या उत्तर यादवकालीन संस्कृतीचा आविष्कार ज्ञानेश्वरांच्या वर्णनात आढळतो असे गोडसे यांना वाटते. त्यांच्या विवेचनाचे परीक्षण काही उघड चुकीच्या मुद्दयांच्यापासून सुरू करता येईल. गीतेतील या एकोणीस श्लोकांत अस्त्रांचा उल्लेख नाही. महाभारतातसुद्धा अस्त्रांचे उल्लेख उत्तरकालीन असावेत असा गोडसे यांचा सूर आहे. पैकी दोन्ही मुद्दे बरोबर आहेत. पण मूळ महाभारतात भगवद्गीता नसावी, तीच उत्तरकालात महाभारतात प्रविष्ट केली गेली असावी, ही शक्यता गोडसे गृहीत धरीत नाहीत. गीतेची रचना श्रीकृष्ण हा पूर्ण परमात्मा म्हणून मान्य झाल्यानंतरची आहे. याबाबत नुसता विभूतियोग वाचला तरीही खात्री पटण्याजोगी आहे.पण असे जरी असले तरी ज्या कालखंडाला गोडसे वस्तुनिष्ठ कालखंड म्हणतात , त्या काळात भगवतगीता महाभारताचा भाग होती इतके

पोत २३