पान:पायवाट (Payvat).pdf/22

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तिला ऋतुप्राप्ती होते. पण यापूर्वीच तिचे तारुण्य रसरशीत झालेले आहे. ती अंगापिंडाने सुडौल झालेली असून, वल्लरीला तर पाठीमागून पाहताना ती इंदिराकाकूसारखी दिसते. वयात न आलेली ही पोरगी कोदंडाला पाहिल्याबरोबर 'इतका तरुण आणि ब्रह्मचारी' असा विचार करू शकते. आपल्याहून लहान मैत्रिणींची लग्ने झाली, त्या संसार करू लागल्या, त्यांना क्वचित मुलेही झाली, आपले मात्र लग्न अजून झाले नाही, ते व्हावे म्हणून परमेश्वराला भीड घालण्याइतकी शारदा विवाहाला आतुर झालेली आहे. म्हाताऱ्या नवऱ्याबरोबर आपला संसार सुखाचा होणार नाही याची तिला पक्की जाण आहे. प्रेम अधिक की पैसा अधिक ? लग्नानंतर मुले होतील की विधवा होऊ ?-या सर्व प्रश्नांवर तिचे विचार नक्की ठरलेले आहेत. भुजंगनाथाशी लग्न ठरत असतानासुद्धा कोदंडाचे चिंतन करणारी, लग्न मोडण्याच्या दुःखात असतानासुद्धा कोदंड आपले पाणिग्रहण करतो असे स्वप्न पाहणारी शारदा वयात येण्यापूर्वीच खूपच ज्ञानी आणि जाणकार झालेली दिसते. यामुळेच की काय देवलांनी कोदंडाबरोबर तिचा सुरेख गांधर्व विवाह एकदा स्वप्नात आणि एकदा नदीकाठी घडवून दिलेला आहे. माझे पाणिग्रहण करून मला पत्करा किंवा मला मरू द्या, असा विलक्षण पेच कोदंडासमोर उभी करणारी शारदा सुंदर, सुबक, टेंगणी असेल, पण ती सरळ-साधी आहे यावर विश्वास बसणे कठीण होऊन जाते.
 शारदा-कोदंडाच्या भेटीचा योगायोग आपणाला पुन्हा कृत्रिमाच्या जगात घेऊन जातो. याखेरीज 'शारदे'त योगायोगाने भेटी आहेत. चोरून ऐकणे, डाव समजणे, वेष पालटणे, इशाऱ्याची पत्रे पाठवणे, नायकाने कैदेत पडणे, योग्य वेळी सुटणे, खलनायकास ऐनवेळी पोलिसांनी पकडणे, खलनायकाने विश्वासू म्हणून मानलेला सहकारी नायकाचा मित्र असणे, ऐन लग्नाच्या एक-दोन दिवस आधी गंगापुरातून लाचखोर अधिकारी बदलले जाऊन शुद्ध तुळशीपत्र असलेले अधिकारी तेथे येणे- हा मालमसाला भरपूर आहे. स्वप्ने केवळ शारदेलाच पडत नाहीत. ती भुजंगनाथालाही पडतात. शारदेच्या स्वप्नात कोदंड येऊन तिचे पाणिग्रहण करतो. भुजंगनाथाच्या स्वप्नात लनाची वरात निघताना राजदूत येऊन पकडतात व कोदंड हसतो असे येते. भद्रेश्वर दीक्षितांनाही स्वप्ने पडतातच. पण त्यांच्या स्वप्नात काय येते हे नाटकात सांगितलेले नाही. सगळ्या बाबी एकत्रितरीत्या विचारात घेतल्या, तर 'शारदे'त वास्तववादापेक्षा सांकेतिकतेचे, कृत्रिमाचे, स्वप्नरंजनाचे रंग अधिक गडद आहेत असा निर्णय घेणे भाग पडते.

  ही सगळी चर्चा 'शारदा' नाटक चांगले नाटक आहे की नाही या संदर्भात विचारात घ्यायची नाही. 'शारदा' हे समस्याप्रधान वास्तववादी नाटक आहे की नाही इतक्या मुद्दयापुरता हा विचार चालू आहे. 'शारदा' नाटकाची परिणामकारकता, त्याचे चांगलेपण हे वादातीत आहेच. एखादे नाटक चांगले असण्यासाठी ज्या प्रकारचा वास्तवाभास त्या नाटकात असावा लागतो, तो 'शारदे'त आहे. फक्त सामाजिक वास्तववाद या ठिकाणी नाही इतकाच माझा मुद्दा आहे. 'सौभद्रा'सारखे नाटक अतिशय लोकप्रिय झाले.या

१६ पायवाट