पान:पायवाट (Payvat).pdf/197

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 जीवनवादी समीक्षेला आपणासमोरील मूलभूत प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत असे जाणवतच नाही. कलावादी समीक्षेला आपल्या भूमिकांचे आधार नीटसे सिद्ध करता येत नाहीत. अशा चक्रव्यूहात वाङ्मयीन समीक्षा सापडलेली आहे. ही तिची अवस्था या दशकातच निर्माण झाली असे नसून ती समीक्षेची जुनीच अवस्था आहे. कूसपालट करून तीच अवस्था याही दशकात चालू आहे. परस्परांच्याविरुद्ध उभ्या असणाऱ्या जीवनवादी आणि कलावादी समीक्षेत काही व्याजभूमिका शिरलेल्या आहेत. या व्याजभूमिका निष्कारणच बुजगावणे म्हणून उभ्या असतात. त्यांमुळे मूळ प्रश्न बाजूला राहून जातात आणि खोटेच प्रश्न पुढे येतात. व्याजकलावादी समीक्षा कलात्मक व्यवहाराला रंजनाचे साधन समजते. ती नकळत कला आणि करमणूक यांच्या क्षेत्रांत सरभेसळ करीत जाते. हा रंजनवाद्यांचा उथळपणा सर्व जीवनवादी समीक्षकांना धोक्याचा वाटतो. व्याजजीवनवादी भूमिका कलेच्या व्यवहाराला प्रचाराचे साधन समजते. कलावादी समीक्षकांना या ठिकाणी फार मोठा धोका जाणवतो. कलात्मक व्यवहार रंजनाचे साधन म्हणून असला काय आणि प्रचाराचे साधन म्हणून असला काय, हा साधन म्हणून असणारा व्यवहार अपेक्षित परिणाम साधण्याच्या सूत्रातूनच चालत असतो, तिथे कलावंताला आपल्या अनुभवाशी प्रामाणिक राहण्याची सोय नसते. स्वतःच्या अनुभवाशी प्रामाणिक राहणे गौण, रंजनाच्या अगर बोधाच्या मोजपट्ट्यांनी आपला अनुभव वेतून नीटस करणे मुख्य, असा व्यवहार तिथे चालू असतो. या व्याजभूमिकांनी दिलेल्या हुलकावण्या आपण बाजूला सारल्या पाहिजेत.
 खरी जीवनवादी समीक्षा आणि खरी कलावादी समीक्षा कलावंताच्या अनुभवस्वातंत्र्याला बाधा आणीत नसते. अनुभवाशी संपूर्णपणे प्रामाणिक राहून आविष्कार करण्याच्या त्याच्या स्वातंत्र्याला बाधा आणीत नसते. कलांचा विचार करण्याविषयीच्या या दोन्ही भूमिका कलानिर्मितीच्या व्यवहाराचा जो प्रकृतिसिद्ध नियम आहे, तो मान्य करून मगच पुढे जातात. या दोन समीक्षांमधील मतभेद हे कलाकृतींचे मूल्यमापन करताना कोणत्या भूमिका स्वीकाराव्यात, या मुद्दयावर आहेत. जो अनुभव घेतो, त्याच्या गृहीत मूल्यांचा परिणाम वाङ्मयाच्या महत्तेवर होतो; कारण लेखकाची गृहीत मूल्ये त्याच्या अनुभवाचा अंतर्गत परिघ आणि त्याच्या आकलनाचा व्याप ठरवितात- असे जीवनवादी समीक्षेला म्हणायचे असते. आकलन करणाऱ्या, अनुभव घेणाऱ्या कलावंताच्या आकलनाची भूमिका आणि व्याप मूल्य म्हणून स्वीकारायचा की नाही, या मुद्दयावर या दोन भूमिकांचे मतभेद आहेत. कोणती कलाकृती श्रेष्ठ मानावी यावर हे मतभेद नसतात, तर त्या कलात्मक श्रेष्ठतेचे स्पष्टीकरण कसे द्यावे यावर हे मतभेद असतात.

 कलावादी समीक्षेला जोपर्यंत जीवनातील आपल्या व्यवहाराचे महत्त्व आणि जीवनव्यवहारापेक्षा आपल्या अस्तित्वाची निराळी पातळी सिद्ध करता येत नाही. तोपर्यंत ही समीक्षा समाधानकारक वाटणे शक्य नाही. ललित वाङ्मयातील सगळेच प्रवाह आणि परिवर्तने जर जीवनाच्या सदंर्भात स्पष्ट करणे भागच असेल, तर मग

गेल्या दहा वर्षांतील मराठी समीक्षा १९१