पान:पायवाट (Payvat).pdf/196

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जाणीवपूर्वकतेने एखाद्या कल्पनेसाठी जीव देतात, हेही सत्य आहे. एखादा राजकीय नेता एखाद्या मुद्दयावर अडून बसला म्हणजे तो प्राणांतिक उपोषण करतो. हे प्राणांतिक उपोषण खायला अन्न नाही म्हणून चाललेले नसते. अन्न समोर असते, खाण्याचा आग्रह असतो, तीव्र भूकही लागलेली असते, मोठ्या जिद्दीने माणसाचा ध्येयवाद आपल्याच स्वाभाविक प्रेरणा स्वेच्छेने पायाखाली तुडवीत असतो. सामान्यत्वे आपल्या प्रकृतीला अनुकूल होईल अशी संस्कृती माणूस निर्माण करतो. पुष्कळदा तो तडजोडही करतो. पण असामान्यत्वे प्रकृती दडपून त्याची संस्कृती त्यावर उभी राहते.
 आपण हे मान्यच करतो की, उपाशी माणसाला काव्यरस पिण्याची इच्छा नसते. पोटशूळ उठलेल्या माणसाला कवितेत रस घेणे शक्य नसते. काव्याचा आस्वाद स्वार्थनिरपेक्ष असतो, असे सांगतानाच आपण स्वार्थाला त्यात बाधा नसते, स्वार्थाच्या तो अविरोधी असतो, असेही सांगतो. स्वार्थाच्या विरोधात उभी राहिलेली संस्कृती आणि सांस्कृतिक मूल्ये लौकिक पातळीवर आहेत असे म्हणणाऱ्यांनी सामान्यत्वे स्वार्थाच्या विरोधात न टिकणारा वाङ्मयीन प्रत्यय हा मात्र अलौकिक आहे असे म्हणावे हेच आश्चर्य आहे. वाङ्मयीन आस्वादात आपण स्वार्थनिरपेक्ष आस्वाद घेतो हे बव्हंशी खरे आहे. कोणताही स्वार्थ गुंतलेला नसताना आपण हसतो, रडतो, चिडतो, संतापतो, सुखी वा दुःखी होतो. पण लौकिक जीवनातही रोजच आपण हे करीत असतो. निरनिराळ्या मुद्दयांवर आपण भांडतो. माझ्या पाहण्यात अशी माणसे आहेत आणि ती माझी मित्र आहेत की, त्यांना स्वतःचा अपमान सहन होतो पण 'पूज्य पोथी'चा अपमान सहन होत नाही.

 सांस्कृतिक संदर्भाशिवाय अनुभवांना केवळ अनुभव म्हणून कलेच्या क्षेत्रात पकडता येणेच शक्य नसते. प्रत्येक घटनेमागे भावनांचे ताण उभे असतात, त्यांची मूल्ये व संदर्भ जीवनातून येतात, लौकिक पातळीवरील संस्कृतीतून येतात. संस्कृतीने भावनांना स्वार्थनिरपेक्ष आवाहने आणि आस्वादकता निर्माण केली आहे, म्हणूनच वाङ्मयीन व्यवहार शक्य होतो. हे जर सारे खरे असेल, तर कलांचे क्षेत्र जीवनापेक्षा स्वतंत्र, पृथक आणि जीवननिरपेक्ष आहे असे कसे म्हणणार ? त्या भूमिकेच्या सिद्धतेचा पुरावा तरी आपण कुठून देणार ? याचा अर्थ वाङ्मयाचे क्षेत्र स्वायत्त नाही असा नव्हे. सगळ्याच शास्त्रांना स्वतःची एक स्वायत्तता आहे. त्या-त्या क्षेत्रात ते-ते शास्त्र स्वायत्त असतेच. व्याकरणाला पदार्थविज्ञानाचे नियम लावता येत नाहीत, आणि पदार्थविज्ञानाला मानसशास्त्राचे नियम लागू होत नाहीत. शास्त्र आणि कलांच्या व्यवहाराला आपापली स्वायत्तता असतेच. पण ती जीवनाच्या पातळीवर, लौकिक पातळीवर, जीवनाच्या कक्षेच्या आत असणारी स्वायत्तता असते. सांस्कृतिक जीवनाच्या सार्वभौमत्वाला मान्यता देऊन कलांचे क्षेत्र आपली स्वायत्तता निर्माण करते आणि कलांच्या क्षेत्रातसुद्धा प्रत्येक कलाप्रकाराला स्वतःची स्वयत्तता असते. स्वायत्तता फक्त कलाजगतालाच असते, कारण हे कलाजगत अलौकिक आहे एवढाच माझा प्रतिवाद चालू आहे.

१९० पायवाट