पान:पायवाट (Payvat).pdf/188

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चांगली गोष्ट आहे. आपल्यासमोर असणाऱ्या आव्हानांचा नीट विचारच करायचा नाही, या जीवनवादी समीक्षेच्या पद्धतीपेक्षा ही धडपड चांगली आहे. पण अजून कलावादी समीक्षेला आपल्या प्रतिपादनासाठी भक्कम असे आधार सापडत नाहीत. ज्या दशकाविषयी मी बोलतो आहे, त्या दशकामध्येही ती याच मुद्दयावर घोटाळते आहे.
 कलेच्या स्वायत्ततेच्या क्षेत्राचे स्वरूप कसे आहे ? ते स्वतःसिद्ध आहे का ? जर ते स्वतःसिद्ध असेल तर मग कलेला आपल्या क्षेत्राची स्वायत्तता सिद्ध करण्यासाठी वेगळा पुरावा देण्याची अशी गरजच नाही. आपली स्वायत्तता गृहीत धरून, ही स्वायत्तता नाकारणाऱ्यांना तुमची कारणे बरोबर नाहीत, असे कलावंत सांगू शकतील. परिस्थिती याच्या अगदी उलट आहे. कलेच्या क्षेत्रातील स्वायत्तता ही सर्वमान्य अशी गृहीत बाब नाही. मागोमागच्या कलावंतांनी आपण पुनः पुन्हा लोककल्याणाचे पाईक आहोत असे आवर्जून सांगितलेले आहे. जीवनाच्या विकासात निर्माण होणाऱ्या सगळ्याच घटना आणि प्रक्रिया जीवनाचा भागच आहेत, असे मानण्याची सर्वांचीच स्वाभाविक प्रवृत्ती असते. पुष्कळ कलावंतांचीही हीच प्रवृत्ती आहे. यामुळे कलावाद्यांना आपले पृथक अस्तित्व, आपल्या क्षेत्राची स्वायत्तता तपशिलाने सिद्ध करावी लागते आणि इतरांना पटवून द्यावी लागते. कलावादी समीक्षकांनी अतिशय परिश्रमाने ही भूमिका सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

 कलेचे स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करण्यासाठी कोणकोणत्या लेखकांनी कोणकोणत्या भूमिका घेतल्या, याची नामावळी देण्यात अर्थ नाही. लेखक महत्त्वाचे नाहीत. त्यांच्या नावांच्यापेक्षा त्यांच्या भूमिका महत्त्वाच्या आहेत. आपले पृथक अस्तित्व सिद्ध करण्यासाठी कलावाद्यांना तीनच भूमिका घेता येणे शक्य होते व त्या तिन्ही भूमिका त्यांनी घेतलेल्या आहेत. पहिली भूमिका आपली मूल्ये निराळी आहेत असे सांगणारी आहे. जीवनाची मूल्ये निराळी आहेत, कलांची मूल्ये निराळी आहेत. ही जीवनमूल्ये जर लौकिक मूल्ये मानली तर लौकिक जगात चांगले काय आणि वाईट काय, इष्ट काय आणि अनिष्ट काय, हे ठरविण्यासाठी उचित अशा कसोट्या या मूल्यांच्या रूपाने उभ्या राहिलेल्या आहेत असे म्हणावे लागेल. या कसोट्यांपेक्षा कलाजगतातील कसोट्या निराळ्या आहेत. त्या अलौकिक आहेत. ही मूल्यांची अलौकिकता कलाजगताच्या पृथक अस्तित्वाचा एक आधार आहे !
 जीवनात जे अनुभव येतात, ज्या भावना आपण अनुभवतो, जे विचार जीवनात आहेत, त्या सर्वांच्यापेक्षा कलांच्या जगातील भावना निराळ्या आहेत. त्यांचा आस्वाद निराळा आहे. याठिकाणी येणारा भावानुभव जीवनातील भावानुभवापेक्षा निराळा आहे. ही आस्वादाची अलौकिकता हा या क्षेत्रातील स्वायत्ततेचा आधार आहे. आणि ज्या पातळीवर जीवन अस्तित्वात आहे, त्यापेक्षा कला-जगतातील अस्तित्वाची पातळीच वेगळा आहे, ते अस्तित्व अलौकिक आहे, हा आपल्या पृथक अस्तित्वाचा कलावाद्द्यांना मानलेला तिसरा आधार आहे. विचारांना कुठूनही आरंभ केला, आणि कोणत्याही परिभाषेत आपले विचार मांडले तरी कसोट्यांची अलौकिकता, आस्वादाची अलौकिकता

१८२ पायवाट