पान:पायवाट (Payvat).pdf/187

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यांच्यासमोर असणारा पहिला प्रश्न कलेच्या क्षेत्रातील स्वायत्तता आखून देण्याचा आहे. जीवनाच्या क्षेत्रापेक्षा आमचे क्षेत्र निराळे आहे. तुमच्या जीवनमूल्यांची लुडबूड येथे नको, त्याच्या बऱ्या-वाइटाचा तापही आम्हांला नको, आमचे स्वतःचे असे एक वेगळे साम्राज्य आहे,–ते लहान असेल, मोठे असेल, पण ते वेगळे आहे,- कलेच्या क्षेत्रातील हे वेगळेपण शिल्लक राहू द्या, जीवनाच्या उपयोगी पडणे हे आमचे काम नव्हे, तुमचा-आमचा फारसा संबंध नाही- असे कलावाद्यांना म्हणायचे असते. जीवनाच्या क्षेत्रात परंपरा, धर्म आणि शासन यांनी जी विचारसरणी प्रस्थापित केली होती, तिच्याविरुद्ध बंड म्हणून कलावंताचे स्वातंत्र्य सांगतानाच कलावादी भूमिकेचा उदय झालेला आहे. पण जीवनातील प्रस्थापिताला तुमची मूल्ये आम्ही स्वीकारणार नाही हे सांगतासांगता जीवनाचा कोणताच संबंध आम्ही मान्य करणार नाही, कोणतीच मूल्ये मान्य करणार नाही या भूमिकेपर्यंत कलावादी आले. मर्ढे करांच्या पद्धतीने सांगायचे तर ललित कलांची व्यावहारिक उपयोगिता तर काही नाहीच, पण सांस्कृतिक उपयोगिताही नाही. मर्ढेकर ललित कलांची सांस्कृतिक फलनिष्पत्ती शून्य मानतात. हे शून्य आहे याचा अर्थ काय ? तर ते कोणत्याच दृष्टीने महत्त्वाचे नाही. जीवनाला प्रत्यक्ष उपयोग, सांस्कृतिक उपयोग या दृष्टीने तर कलांचे महत्त्व नाहीच, पण भावनांच्या आणि विचारांच्या दृष्टीनेही कलांचे महत्त्व नाही. वैचारिकतेसाठी कलांचे जग प्रसिद्ध नसतेच. या जगातील भावनाही लौकिक जगापेक्षा भिन्न आहेत असे म्हटले की जीवनाशी असणारा कलाजगताचा सगळा संबंधच तुटून जातो. ललित कलांच्या जगाची निखालस आगि निरपवाद स्वायत्तता सिद्ध करणे हा कलावाद्यांच्यासमोरचा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न या जगाचे मानवी जीवनात महत्त्व आणि प्रतिष्ठा सिद्ध करण्याचा आहे. जे जीवनाला कोणत्याच दृष्टीने उपयोगी नाही ते जीवनात अतिशय महत्त्वाचे आहे, त्याची प्रतिष्ठा व स्वातंत्र्य सांभाळले गेले पाहिजे असे कलावाद्यांना म्हणायचे आहे. या दृष्टीनेच मर्ढेकर कलांच्या आस्वादाला ईश्वरी वरदानाहनही श्रेष्ठ वरदान असे मानतात.

 कलांची स्वायत्तता आणि कलांचे महत्त्व या दोन भूमिकांत विसंवाद असण्याचे काहीच कारण नाही. लौकिक जीवनातही अनेक क्षेत्रे स्वायत्त आहेत. त्या त्या क्षेत्रांचे महत्त्व लक्षात घेऊनच त्यांना अंतर्गत स्वायत्तता दिलेली असते. पण ज्यावेळी आमचा तुम्हांला कोणताच उपयोग नाही पण तुम्ही आम्हांला मात्र प्रतिष्ठेने वागवा असे सांगण्याची पाळी येते, त्या वेळी त्या भूमिकेत विसंवाद निर्माण होतो. सौंदर्याला प्रत्यक्ष उपयोगिता नसते, व्यावहारिक उपयोगिता नसते, इतक्या अर्थाने सौंदर्य उपयोगशन्य असते असेही म्हणता येईल. आणि मग इतर कोण्यातरी कारणाने त्याचे महत्त्व सांगता येईल. पण कोणतीच उपयोगिता नसते असे म्हटल्यानंतर त्या कलाजगाचे कोणतेच महत्त्व सांगता येत नाही. कलावादी भूमिकेला हा विसंवाद कधी टाळता आलेला नाही. हा विसंवाद टाळण्यासाठी कलावादी समीक्षा सतत प्रयत्न करते आहे, ही त्यातल्यात्यात

गेल्या दहा वर्षातील मराठी समीक्षा १८१