पान:पायवाट (Payvat).pdf/14

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


  'शारदा' नाटकात विधवाविवाहाला अनुकूलता अगर प्रतिकूलता दाखवण्याची वेळ आलेली नाही. पण देवलांनी स्पष्टपणे बालविवाहांना अनुकूलता मात्र दाखवलेली आहे. शारदेच्या सगळ्या मैत्रिणींची लग्ने लहान वयांत झाली आहेत. कारण त्यांचे बाप मुलीची चिंता करणारे प्रेमळ बाप आहेत. शारदेचे लग्न लहान वयात झाले नाही, कारण तिचा बाप द्रव्यलोभी आहे. म्हणून तर आपले लग्न कधी होईल अशी चिंता करण्याची वेळ शारदेवर आलेली आहे. 'शारदा' नाटकातील संदर्भ ऋतुप्राप्तीपूर्वीच्या बालविवाहांना अनुकूल आहेत हे केवळ त्या काळच्या परिस्थितीचे चित्रण नव्हे. ती देवलांच्याही मनाची स्वाभाविक घडण आहे. बालविवाह नसावेत असे आग्रहाने प्रतिपादन करणाऱ्या देवलांच्या समकालीनांना बारा वर्षाखालील मुलीचा विवाह होऊ नये इतकेच म्हणायचे होते. बाराव्यातेराव्या वर्षी मुलगी विवाहाला योग्य होते असे हे सुधारकसुद्धा मानीत होते. विषम-विवाहातील वर हाही आपल्या भोवतालच्या सामाजिक परिस्थितीचे भक्ष्य असतो. आपल्या मुलीच्या वयाच्या एका अर्भकाशी लग्न करताना तोही मनातून ओशाळून जात असावा. स्वतःच्या प्रकृति धर्मासमोर आणि परिस्थितीसमोर हा वरही लाचार झालेला असतो. या वराला लहान, सुबक, ठेंगणी पत्नी नको असते. तो सौंदर्याची फारशी चिकित्सा करीत नाही. त्याला शक्य तितकी मोठी दिसणारी, थोराड अंगापिंडाची आणि विवाहानंतर शक्यतो लवकर वयात येणारी गृहिणी हवी असते. रूप-सौंदर्याकडे कानाडोळा करण्यास हा वर तयार असतो. वधूपित्याचे घराणे आपल्या बरोबरीचे आहे की नाही याची चौकशी करण्यास त्याला वेळ नसतो. प्रथम विवाहाच्या वेळी रूप, हुंडा, कुलीनपणा या बाबींना त्या काळी फार मोठे महत्त्व असे. बिजवराच्या लग्नात या बाबी गौण असतातः त्या ठिकाणी शक्यतो लवकर 'संसाराला लागणारी मुलगी' एवढा एकच प्रश्न महत्त्वाचा असतो. सत्तर वर्षांच्या सुदाम-सावकारावर ताण करील अशी देखणी बायको पाहिजे हे म्हणणारा भुजंगनाथ विषम-विवाहातल्या वरांचा प्रतिनिधी नसतो. अम्लान, ताज्या सौंदर्याचा नित्य उपभोग घेण्यास वखवखलेला असा तो मध्ययुगीन बादशहा वाटतो. ज्या प्रमाणात असे वाटत जाईल, त्या प्रमाणात या नाटकातील समाजदर्शनाची वास्तवता मावळत जाणार आहे. नाटकाच्या प्रस्तावनेतच नटीच्या तोंडून देवलांनी सुदाम-सावकाराची वधू दहा वर्षांची आहे असा उल्लेख केला आहे. सत्तराव्या वर्षी लग्न करणारा माणूस विवाहसौख्यासाठी अजून चार वर्षे वाट पाहण्याइतका बिनघोर मनाचा नसतो, हे कुणाच्याही लक्षात येऊ शकेल.
 जाणूनबुजून म्हाताऱ्याच्या गळ्यात आपली मुलगी बांधणारा वधूपिता हाही आपण समजून घेतला पाहिजे. त्याच्याजवळ अपत्यविषयक ममता नसते असे समजण्याचे काहीच कारण नाही. बिजवराला मुलगी देणारा बाप हा दारिद्रय आणि कर्जबाजारीपणा यांमुळे खंगलेला व पराभूत झालेला बाप असतो. तोही मनातून ओशाळलेलाच असतो. आपल्या एका अपत्याचे बिजवराशी लग्न लावून तो सधनाच्या शेल्याला आपली गाठ बांधू पाहात असतो.

८ पायवाट