पान:पायवाट (Payvat).pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अंधार पसरल्यासारखा झाला. यानंतर सुतकीपणाचा प्रारंभ होतो. दगडी गाऊन घातलेले कारखाने विचारांत बुडाले. येथील कारखान्यांना असणारे हृदयशून्य गाऊन आणि या हृदयशून्यांनाही विचारांत बुडविण्याएवढा आघात पाहण्याजोगा आहे. यानंतर सगळेच ओले खमीस खांद्यावर टाकून खुराड्याकडे वळले. हे खुराड्याकडे वळणारे दगडी कारखानेही आहेत, मजूरही आहेत. इथे प्रेतयात्रेतन ओलेत्याने शेवटचा निरोप घेऊन दहनानंतर परतणारे अंतेवासीही आहेत. बंद कारखान्यांतून घरी परतणारे मजूर आणि प्रेतयात्रेतून ओलेत्याने परत येणारी माणसे या दोन्हींचाही संकर 'ओले खमीस' या प्रतिमेने झाला आहे. जे पाटी शेकवीत बसले होते, ते प्रथम करडे झाले. आता ओले खमीस खांद्यावर टाकून ते परतत आहेत. जणू प्रत्येकाच्या घरातील एक माणूस गत झालेला आहे. या भव्य दुःखाला अधिक गडद करणारी एक क्षुद्र पातळी आहे. ही क्षुद्र पातळी आज सुट्टी मिळाली या आनंदात बुडालेली आहे. एवढा मोठा आघात झाल्यानंतरसुद्धा माणसे या क्षुद्र पातळीवर का जातात ? कवीच्या मनात ह्याचा तिरस्कार नाही. यांनाही समजून घेण्याइतकी व्यापक सहानुभूती कवीजवळ आहे. कारण हे जग न संपणारा थकवा खांद्यावर घेऊन कायमचे उभे असणारे, शीण पेलणारे जग आहे. पाठी शेकवीत बसलेल्या घरांच्या शेजारीच आपला थकवा घेऊन तसेच रखडत उभे राहिलेले हे थकलेले जीवित आहे. या जीविताला खाटेवर कलण्याची या आघातामुळे संधी मिळाली. या सर्वांच्या मधोमध कवी उभा आहे. ज्यांना काळोखाने माणिक गिळल्याचा प्रत्यय आला, त्यांचाही कवी भागीदार आहे. जे खांद्यावर ओले खमीस टाकून परतले त्यांचाही, आणि जे खाटेवर कलले त्यांचाही. हा 'कलण्या'चा भाग एकदा वरच्या 'कलकलण्या'शी जोडून पाहिला म्हणजे पाटी शेकणारे आणि शीण पेलणारे यांच्यातील काही संबंध दिसू लागतात. या वातावरणात कवीला कागदी खोळीत उजेड घेऊन चाललेला हातगाडीवाला योगायोगाने भेटतो. हा योगायोगच म्हटला पाहिजे. कारण या वातावरणात जसा कागदी खोळीत उजेड घेऊन जाणारा भेटेल, तसा कागदी खोळीत अंधार घेऊन जाणाराही भेटेल. उजेड घेऊन जाणारा भेटला हा योगायोग, आणि 'वा! राव पुढे काळोख दात विचकीत असेल' असे तो म्हणाला, हाही योगायोग. पण या दोन्ही योगायोगांनी त्या काळोखाला नवा अर्थ दिला आहे. हातगाडीला नवा अर्थ दिला आहे. सगळ्या घटनेलाच एक नवे परिमाण दिले आहे. सुर्व्यांच्या कवितेतील अनेकार्थता संपेल की काय, याबद्दल हळहळणाऱ्या मंडळींनी या कवितेतील एकएका शब्दामधून निर्माण होणारी अर्थाची वलये पाहून घेतली पाहिजेत.

 ही कथा फक्त 'नेहरू गेले त्या वेळची गोष्ट ' इतकीच नाही. जाणाऱ्याचा क्रम अखंड चालू आहे. प्रत्येकाच्या जाण्याची कथा पुन्हा निराळी आहे. असे अजून एक जीवनातून निघून जाणे 'घंटा' या कवितेत दिसेल. तिचे अखेरचे शब्द 'जातेरे ' असे उमटले आणि ती निघून गेली. मरण हा जाणाऱ्यांचा शेवट असतो. पण या ठिकाणी जाणाऱ्यांचाही हा शेवट राहिलेला नाही. कारण जाणारी नुसती गेलेली नाही तर

१२६ पायवाट