पान:पायवाट (Payvat).pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

निघालेच पाहिजे हा आग्रह धरणेही बरोबर नव्हे. ही दुसरी बाब लक्षात घेऊन या कवितांकडे पाहावे लागते. या कवितांचे महत्त्व सलगपणे प्रत्येकीचे एक जिवंत अनुभव या दृष्टीने मूल्य आणि सर्वांचे मिळून कविप्रकृतीचा अनुभव घेण्याच्या पातळीचा विशेष असे दुहेरी असते. कोणाही कवींच्या कवितेत त्याचे आत्मनिवेदन किती प्रमाणात असते याचा पुरावा कधी कवितेतून सापडणारा नसतो. कवितेत शब्द असतात. हे शब्द एक एकात्म अनुभव वाचकांसाठी साकार करतात. त्याच्यामागे जाऊन या अनुभवाचा कवीच्या खाजगी जीवनाशी संबंध काय, हे विचारण्यात अर्थ नसतो. कारण माणसाच्या ठिकाणी सहकंपाची एक विलक्षण शक्ती असते. कोण कशाशी समरस होईल हे सांगता येणे कठीण असते. कवीचा स्वतःचा सामाजिक वर्ग हा नेहमीच कवितेचा सामाजिक वर्ग असेल, अशी खात्री देता येत नाही. पण कवितेतून जे दिसते आहे ते असे की, कवी कथा सांगतो आहे. एका प्रदीर्घ कथेचा एकएक पदर, एकएक घटक त्याची प्रत्येक कविता उलगडून दाखवीत असते. आपल्या कवितेतून स्वतःचे अनुभव आणि प्रतिक्रिया सांगतानाच कवी स्वतःचीही कथा सांगत असतो. त्याच्या मनाला जाणवलेल्या भोवतालच्या जीवनाचीही कथा सांगत असतो. ही कविता पुष्कळदा एका सार्थ योगायोगाची बनलेली असते.
 या ठिकाणी सार्थ आणि योगायोग दोन्ही शब्दप्रयोग महत्त्वाचे आहेत. असा सार्थ योगायोग 'नेहरू गेले त्याची गोष्ट ' या कवितेत पाहायला सापडेल. नेहरूंच्या मृत्यूची बातमी आली आणि कारखाने बंद झाले. जे आतापर्यंत स्तब्ध आणि सुस्त असे जग दिसत होते, ते एकदम व्याकूळ होऊन उठले आणि सगळीकडे हरताळ पडला. सुर्वे यांच्या कवितेचे सूचकतेचे प्रमाण किती मोठे आहे हे पाहण्याच्या दृष्टीने, आणि अनेक संदर्भ त्यांची कविता कसे लीलया स्पर्शून जाते ते पाहण्याच्या दृष्टीने एकदा ही कविता तपासली पाहिजे. आरंभालाच कवी पाठी शेकवीत बसलेली घरे कलकल्ली म्हणून सांगतो. यांतील कलकलली या शब्दात असणारा गोंधळ, आक्रोश, आर्तता आणि व्यथा यांचा समुच्चय पाहण्याजोगा आहे. ही घरे पाटी शेकवीत बसली होती. सुस्तपणे ऊन खात रवंथ करणारी, सुस्त, सुरक्षित मने, आणि पाटी शेकवीत बसलेली घरे हा संकरही पाहण्याजोगा आहे. एका बाजूला सुरक्षिततेच्या विश्वासाने चालू असलेली विश्रांती आणि दुसरीकडे अनपेक्षित आघातानंतर झालेला बोलका विपाद, यांच्या विसंवादाचेही चित्र आहे. हा नियतीचा निर्णय मान्य करणे सर्वांनाच भाग होते. हा आघात एकीकडे सुन्न करणारा होता, दुसरीकडे प्रतिकाराची सोयच नव्हती. पराभूत मनाने आले दुःख मान्य करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. पुढच्या ओळी हा कलकलाट शांततेत कसा क्रमाने बुडून गेला हे सांगतात. पाहता पाहता सारे शहर करडे होऊन गेले. यातील 'करडे' या शब्दात असणारा फिकटपणाचा, कोरडेपणाचा समुच्चय पुन्हा विचारात घेतला पाहिजे. नंतर सगळे शहर अंजिरी झाले. आणि पुढे काळोखाने माणिक गिळून टाकले. या साऱ्या अवस्था एकाच वेळी शहराच्याही आहेत आणि देशाच्याही आहेत, कविमित्राच्याही आहेत. सर्वांच्याच समोर एकाएकी

नारायण सुर्वे यांची कविता १२५