पान:पायवाट (Payvat).pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हणजे मग कवितेच्या रसग्रहणातील तोलसुद्धा सुटू लागतो; त्यातील हा प्रकार आहे.
 हे मुठी वळलेले हात 'माझे शब्द' या कवितेत आहेत. या कवितेची सगळी रचनाच थोड्या निराळ्या धर्तीची आहे. उद्याच्या सुरवी जगाचे स्वप्न कवीच्या डोळ्यांसमोर आहे. एक दिवस सामान्य माणसाचा विजय होईल आणि तो विजय मिरवीत त्याची पालखी खांद्यांवर घेऊन सामान्य माणसाचे प्रतिनिधी महाद्वारातून येतील. कीने जे आश्वासन दिले आहे, ते यासाठी द्याव्या लागणाऱ्या लढाईचे नाही. हा क्षण ज्यावेळी येईल त्या क्षणाचे स्वागत करण्यासाठी आपण आपल्या गळ्याखाली घोष लपवून ठेवले आहेत, इतकेच हे आश्वासन आहे. आपल्या व्यथेची कहाणी मुखरित करताकरता वाचेची सगळी शक्ती संपू नये. एक दिवस ही व्यथा संपेल आणि नवे जग अस्तित्वात येईल. त्या जगाच्या स्वागतासाठी काही सूर शिल्लक ठेवले पाहिजेत. त्यावेळी मी असेन, कदाचित नसेन, पण माझे शब्द असतील. ते माझी कथा सांगतील. तो वेळपर्यंत अणूंची शक्ती शिल्लक ठेवली पाहिजे. आज दुःख भोगताना डोळ्यांत अश्रू येतातच, ते कधीकधी पुसतो. कधी गालांवरच वाळू देतो. कधी अश्रूच मित्र होतात. पण सगळे अश्रू इथेच संपणे योग्य नाही. त्या विजयाच्या सोहोळ्याच्या वेळी मन भरून येईल, तेव्हा उपयोगी पडावेत म्हणून दोन अश्रू शिल्लक ठेवले आहेत. या कवितेचीही सगळी भूमिका जेव्हा उद्याचे स्वप्न साकार होईल, तेव्हा मी त्याचे स्वागत करीन इतकेच सांगणारी आहे. सामाजिक क्रांतीच्या गाड्याला माझी कविता जुंपली आहे असे सांगणारी नाही. कम्युनिस्टांविषयी विचार करीत असताना आपण कम्युनिस्ट पक्षाचा राजकीय कार्यकर्ता आणि कवी यांना एकच समजून विचार करतो. हेच गफलतीचे ठिकाण आहे. जगभर कम्युनिस्टांनी काय केले, हा एक स्वतंत्र भाग आहे. काय करण्याची त्यांची इच्छा होती व आहे, हा एक स्वतंत्र भाग आहे. मार्क्सवाद्यांनी आणि कम्युनिस्टांनी संस्कृतीचे महत्त्व कधीही अमान्य केले नाही. मारुती बनविण्याच्या प्रयत्नात त्यांच्या हातून माकड बनले असेल. पण त्यांची इच्छा माकड बनविण्याची नव्हती. स्टॅलिनने जी हुकूमशाही निर्माण केली, ती मॅक्झिम गॉर्कीला अभिप्रेत होती, हे मानणे कृतघ्नपणाचे तर आहेच पण भोळसटपणाचेही आहे.

 फ्रेंच राज्यक्रांतीने जी आश्वासने दिली पण जी पूर्ण झाली नाहीत, ती पूर्ण करण्यासाठी कम्युनिस्ट क्रांती होती. कम्युनिस्टांना हे करता आले काय ? याचे माझे उत्तर नाही असे आहे. पण त्यांची इच्छा काय होती ? समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या कल्पना घोषणेत राहतात; त्या जीवनात साकारच होत नाहीत. कारण माणूस आर्थिक गुलामगिरीने बनलेला असतो. हा माणूस मोकळा करणे, समता-स्वातंत्र्य आणि बंधुता प्रत्यक्ष जीवनात साकार करणे हे मार्क्सवाद्यांचे ध्येय होते. भूक, भीती या चक्रातच नव्वद टक्के मानवजातीचे जीवन दळले-पिसले जात असते. ही माणसाची नव्वद टक्के जात जनावरांची दुःखेच भोगीत असते. त्यांना भूक आणि भीती यांपासून मुक्त केले, तर प्रत्येक माणूस संस्कृतीत सहभागी होऊ शकेल, आणि मग संस्कृतीचा खरा विकास

नारायण सुर्वे यांची कविता १२१