पान:पायवाट (Payvat).pdf/12

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


त्याच्या बाजूला परित्यक्तांचाही प्रश्न असतो. ही गुंतागुंत त्या काळी कुणीच विचारात घेतली नाही. कारण लेखकांच्यासमोर प्रत्येक प्रश्न हा सुटा प्रश्न आहे. हे सुटे प्रश्न ज्या परिस्थितीचा भाग आहेत, त्या परिस्थितीत ते एकमेकांशी बांधले गेलेले आहेत. वैचारिक पातळीवर समाजसुधारणांचा विचार करताना कोणत्याही एका बुरुजावर निकराचा हल्ला झाला की सारी तटबंदी शिथिल होते अशी भूमिका घेता येते. कलावंतांना सामाजिक प्रश्न कलेच्या पातळीवर नेताना प्रत्येक बुरूज हा एका संपूर्ण तटबंदीचा भाग आहे हे विसरून चालत नव्हते.

प्रश्नांचा सुटा विचार करणे ही जी त्या वेळची सार्वत्रिक पद्धत त्याला हरिभाऊ, कोल्हटकर, खाडिलकर, गडकरी-कुणीच अपवाद नव्हते. वामन मल्हारांच्यापासून प्रश्नांचे आंतरिक संबंध लेखकांना क्रमाने दिसू लागतात. सामाजिक प्रश्नावर नाटक लिहावे असा आग्रह आजही नाही. देवलांच्या काळी तर मुळीच नव्हता. पण सामाजिक प्रश्नावर लिहायचे म्हटल्यास तो प्रश्न नीट माहीत असावा इतका आग्रह मात्र जरुरीचा ठरतो. कारण कलावंत जे उमजलेच नाहीत त्याचे चित्रण करू शकणार नाहीत. बाला-जरठ विवाहाचा प्रश्न हा अशा गुंतागुंतीच्या प्रश्नांपैकी आहे. त्या प्रश्नाचे स्वरूप केवळ वधूवरांच्या वयातील अंतराइतके सोपे नाही. दहा वर्षांच्या मुलीचे लग्न चाळीस वर्षांच्या वराशी होणे ही घटना जितकी चिंताजनक आहे, तितकी साठ वर्षांच्या मुलीचे लग्न नव्वद वर्षांच्या वराशी होणे ही चिंताजनक घटना नाही. वयाचे अंतर तेच असले तरी सगळा संदर्भ विवाहाच्या वेळी असणाऱ्या वयामुळे बदलून जातो. दुसऱ्या प्रकारच्या विवाहात निदान मला तरी तीस वर्षांचे अंतर आक्षेपार्ह वाटत नाही.
 बाला-जरठ विवाहाचा प्रश्न एका बाजूने बालविवाहाशी निगडित आहे. सर्व मुलांमुलींची लग्ने लहान वयात व्हायची म्हटल्यानंतर दहाव्या वर्षीपर्यंत मुलींची लग्ने होऊन जातील, आणि आठ वर्षांच्या मुलीचे लग्न करणे प्रशस्त मानले जात असे. परिस्थितीनुसार ही वयोमर्यादा दोन-तीन वर्षांनी वाढत असे. पण बहुतेक मुलींची लग्ने ऋतुप्राप्तीपूर्वी होऊन जात. कचित एखाद्या मुलीला विवाहापूर्वी ऋतू प्राप्त झाला, तर मग लग्न जुळणे फारच कठीण होत असे. आणि म्हणून अशा वेळी ऋतुप्राप्तीची घटना कसोशीने चोरून ठेवण्यात येई. एरव्ही ऋतुप्राप्ती हा सोहळ्याचा भाग असे. देवलांच्या नाटकात विवाहोत्तर ऋतुप्राप्तीच्या सोहळ्याचाही उल्लेख आहे. विवाहपूर्व ऋतुप्राप्तीच्या घटनेचेही चिंता म्हणून वर्णन आलेले आहे. मराठवाडा भागात ही परिस्थिती माझ्या लहानपणी मी पाहिलेली आहे.
  या सामाजिक परिस्थितीत बहुतेक मुलांचे लग्न सोळाव्या वर्षाच्या आतच होऊन जात असे. असा हा मुलगा ऐन पंचविशीत विधुर झाल्यास या मुलाने काय करावे? स्वतः न्या. रानडे व हरिभाऊ असे तिशीच्या सुमारास विधुर झालेले होते. या मंडळींना बारा-चौदा वर्षाच्या मुलीशी लग्न करण्याशिवाय दुसरा मार्गच मोकळा नव्हता.

६ पायवाट