पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/97

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


केलं आहे... माझ्यावर नोटीस का म्हणून? मी काम मंजूर करणारी अॅथॉरिटी नाही...'

 'मी जर असं म्हणालो तर...' यंदे छद्मी स्वरात म्हणाले, “तुम्ही कलेक्टरांना नीट ब्रीफ केलं नाही. त्यांना अंधारात ठेवलं व ही कामे त्यांच्याकडून मंजूर करून घेतली...' त्यांनी आपले वाक्य अर्ध्यावर सोडीत खांदे उडवले.

 ‘धिस इज टू मच सर....' मी हतबुध्द होत म्हणालो, 'तुम्हाला असं म्हणायचं आहे की, भावे साहेबांना काही कळत नव्हतं - मी जे कागद त्यांच्यापुढे ठेवत होतो, त्यावर ते सही करायचे...'

 ‘तुम्ही विपर्यास करीत आहात' यंदे म्हणाले, 'पण जसं तुम्ही म्हणता की, कामे कलेक्टरांनी मंजूर केली, तसंच मीही म्हणेन की, ही नोटीस तुम्हाला आयुक्तांनी दिली, मी नाही. आणि तेही मी त्यांच्यासमोर ठेवलेल्या कागदावर न बघता सही करतात असं म्हणू का?'

 यंद्यांनी मला निरुत्तर केलं होतं.

 मी आयुक्तांना भेटलो, पण त्यांच्याकडे वेळ फार कमी होता. पोलंडच्या राष्ट्राध्यक्षांचा वेरुळभेटीचा कार्यक्रम होता व सतत फोन खणखणत होते. मी त्यांच्याशी दहा मिनिटांपैकी एक मिनिटच बोलू शकलो. अखेरीस ते म्हणाले,

 ‘ओके तुमचं लेखी म्हणणं पाठवा - मी पाहतो...'

 मी त्यांच्या चेंबरच्या बाहेर आलो आणि उपायुक्तांकडे गेलो. ते जुने जाणते व समजूतदार म्हणून समजले जात. त्यांना मी सारं कथन केलं, तेव्हा ते म्हणाले

 ‘देशमुख, अहो, आपण रिस्क कधी घ्यायची नाही. कारण शासनात असं काम करणाऱ्याना कधीही प्रोटेक्शन मिळत नाही तरी मी तुम्हाला जाणतो व माझ्यापरीनं फारसं काही होणार नाही याची काळजी घेईन.... पण मलाही माझ्या मर्यादा आहेत हे तुम्ही जाणता. आणि पुन्हा कमिशनर साहेब माझं ऐकतीलच असं नाही.... आफ्टर ऑल ही इज अॅन आय. ए. एस. ऑफिसर... यू नो....'

 मी तडक मुंबई गाठली. हेतू हा होता की, भावे साहेबांना भेटावं. सारी कल्पना द्यावी. पण तिथं गेल्यावर कळलं की, चारच दिवसांपूर्वी ते दिल्लीला डेप्युटेशनवर रसायन विभागात गेले आहेत.

हमी ? कसली हमी ? / ९५