पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/92

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

यातून मार्ग तर काढलाच पाहिजे लोकांना कामाची फार गरज आहे, त्यांना काम तर दिलंच पाहिजे आणि तुम्ही म्हणता ते खरं आहे, पाझर तलावाची बंद असलेली कामं सुरू होणं कठीण आहे. फार जोर मारला तर माझ्या व दादाच्या मतदारसंघात दोन-चार कामं सुरू करता येतात. आजकाल पब्लिक पण लई बेरकी झालय बघा. आम्हाला मत देतील, पण आमचं ऐकतीलच असं नाही...'

 विचारात मग्न असताना किंवा काही नवीन सुचत असताना बप्पा डाव्या कानाची पाळी चिमटीत धरून हलवतात. आताशी तशीच क्रिया करीत संथपणे म्हणाले,

 'मला वाटतं... हा तुम्हीपण विचार नक्कीच केला असणार की, नॉन प्लान रोडची कामं मोठ्या प्रमाणावर सुरू करणे आवश्यक आहे व कमिशनर नसल्यामुळे व ओ.एस.डी यंद्याच्या चावटपणामुळे प्रस्ताव त्यांच्याकडे पाठवून मंजूर करून घेणे वेळखाऊ प्रकरण ठरेल... तुम्ही असं करा ना ही कामे याच ठिकाणी कलेक्टर साहेबांकडून मंजूर करून द्या व कार्योत्तर मंजुरीसाठी पाठवून द्या. तोवर कमिशनर येतील व मग मी स्वतः त्यांना सांगेन, भावे साहेबही सांगतील. मंजुरी मिळण्यात फारशी काही अडचण येईल असं वाटत नाही.'

 बप्पा गेल्यानंतर किती तरी वेळ मी विचार करीत होतो. ही कल्पना माझ्या मनात येऊन गेली होती, पण त्यात फार मोठी रिस्क होती, करिअरचा प्रश्न होता. शासनामध्ये चाकोरीबाहेर जाऊन काम करणा-यांना कधीही संरक्षण नसतं. आय. ए. एस. कलेक्टरांचं फारसं काही बिघडलं नाही. खरा धोका असतो जिल्हा पातळीवरील अधिका-यांना. माझ्या नजरेसमोर अनेक प्रकरणं होती, जिथं कलेक्टर सहीसलामत सुटले होते व खालचे अधिकारी अडकले होते. पुन्हा कमिशनर हे नियमावर बोट ठेवून काम करणारे, तर तिथं रोजगार हमीचं काम पाहणारे विशेष कार्य. अधिकारी ओ. एस. डी तथा अधीक्षक अभियंता यंदे हे पिना मारण्यात निष्णात असलेले. गतवर्षी इथंच कार्यकारी अभियंता होते, त्यावेळी त्यांचा - माझा खटका उडाला होता अनेकवार. त्यातच बप्पाने तक्रार केली, म्हणून त्यांच्या विभागाच्या एका रोडची चौकशी केली आणि त्यात झालेला भ्रष्टाचार अक्षरशः सुन्न करणारा प्रकार होता. ते प्रकरण आजही चालू आहे. यंदेंनी वरपर्यंत मलिदा चारून प्रयत्न केला आणि त्यांच्याविरुद्ध कसलीही कार्यवाही न होता केवळ ठपका ठेवून सदरचे प्रकरण मिटवण्यात आले. त्यांच्याशी गाठ होती व ते झारीतील शुक्राचार्य ठरण्याचा दाट संभव होता.

पाणी! पाणी!!/ ९०