पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/88

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 ‘दादासाहेब, तुम्ही एवढे अभ्यासू आमदार. तुम्हाला माहीत आहेच की, रस्त्यावर एकूण खर्चाच्या पंचवीस टक्क्यांपेक्षा जास्त खर्च करता येत नाही. ती मर्यादा आपण केव्हाच ओलांडलीय... तुमच्याकडे अनेक पाझर तलाव मंजूर आहेत, पण शेतकरी जमिनी देत नाहीत. कॅनॉलचं कामही कोर्टातून स्टे आणून बंद पाडलंय... तिथं तुम्ही का प्रयत्न करीत नाही?'

 ‘हे तुमचं नेहमीचच आहे देशमुख साहेब-' दादासाहेब म्हणाले, 'मी तोही प्रयत्न करतो, पण शेतकरी आपली जमीन सुखासुखी सोडत नाही. त्याची ती माय असते...'

 'मग कामं कशी होणार ? लोकांना रोजगार कसा मिळणार ?' मी म्हणालो, ‘एकीकडे शेतक-यांचं समर्थन करायचं - जे अशा कामांना जमीन देत नाहीत त्याचे - आणि दुसरीकडे कामही मागायचं - ते मिळत नाही म्हणून उपोषणाचा इशारा द्यायचा? हे विसंगत नाही वाटत तुम्हाला?'

 माझ्या स्पष्ट बोलण्याची त्यांना सवय झाली असावी. त्यावर कसलीच प्रतिक्रिया व्यक्त न करता दादासाहेब आपली मागणी पुढे रेटीत म्हणाले,

 ‘साहेब, आमचे मतदार जसे रयत - गरीब शेतमजूर आहेत, तसेच शेतकरी पण आहेत. दोघांनाही सांभाळावं लागतं. बरं ते जाऊ द्या. ही रोडची कामं दुष्काळात घेतली तर पटकन सुरू होतील व तुमचंही प्रेशर कमी होईल...'

 ‘पण ती सारी योजनाबाह्य कामं आहेत दादासाहेब. ती मंजूर करायचा म्हटलं तर आयुक्तांची परवानगी लागते. त्यासाठी प्रोसीजर आहे आणि मुख्य म्हणजे एवढी कामं ते एकाच वेळी मंजूर करणार नाहीत...'

 'ते तुमचं तुम्ही पाहून घ्या. हवी तर मी एक तार ठोकतो कमिशनर साहेबांना.. पण ही कामं मंजूर झाली पाहिजेत...'

 ‘पण दादासाहेब...'

 ‘महत्त्वाचं काय आहे देशमुख साहेब - लोकांना काम देणं की नियमाचा कीस पाडणं ? अहो, हे नियम आम्हीच केले आहेत ना विधिमंडळात... रोडवरचा खर्च मर्यादित हवा, नॉन - प्लॅन रोड मंजूर करू नयेत... पण मला सांगा कुठला प्लॅन हा कधी परिपूर्ण असतो का? त्यात काही राहून जातंच की?... खरा सवाल आहे की, नियम हे माणसासाठी आहेत की माणसं नियमासाठी?'


पाणी! पाणी!! / ८६