पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/79

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 पुन्हा एकदा गाव आनंदानं बहरून आलं.

 पाणी खेचण्याची कुप नलिका बसवली गेली. पुन्हा एकदा सरपंचांनी सुनंदाला हुकूम सोडला, ‘पोरी, - पयल्यांदा तूच खेच पंप आणि पानी आलं की, न्हाऊन पूजा कर. सदा, तुम्ही जोडीनं उभं राहा.... हे - सारं, पोरी तुझी पुण्याई म्हणायची.... तुझ्यामुळेच गावची पाणीटंचाई कमी होतेय....!'

 सुनंदानं पंपानं पाणी खेचायला सुरू केलं आणि दोन - चार खेचण्यातच तोंडावाटे भळ्ळकन पाण्याची सोंडेएवढी धार बाहेर पडली....!

 मग सदानं पंप खेचून तिला सबंध गावासमक्ष सचैल स्नान घडवलं साऱ्यांच्या नजरेत तिच्याबद्दल आदरभावच होता.

 दोघांनी ओलेत्यांनी त्या इनव्हेलपंपाची विधिवत पूजा केली.

 ‘कृष्णामाई, मी माहेरी येईन तेव्हा तुला खण - नारळाची ओटी वाहीन. तुझ्या अमृतमय पाण्यावर हा देह वाढला, मोठा झाला.....' सुनंदानं हात जोडले होते, ‘वाटलं होतं, मी तुला लग्नानंतर पारखी झाले - पण नाही कृष्णामाई तू माऊली आहेस माझी. इथं खडकातही तुझी कृपा मला सचैल न्हाऊ घालतेय... तुझी अमृतधार देतेय!'

☐☐☐




खडकात पाणी / ७७