पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/75

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मंजूर करवून घेतली होती. तिथं कुणी शिक्षक म्हणून जायला तयार नव्हतं, म्हणून स्वतःहून सदानं तिथं जायची संमती दर्शवली. गेली चार वर्षे तो इथं गावात मुलांना शहाणं करीत होता, प्रौढांसाठी साक्षरतेचे वर्ग चालवत होता.

 पण पाणीटंचाईनं तो अस्वस्थ व्हायचा. पण डोंगरपठारावर विहीर घेणं शक्य नव्हतं. आणि खालच्या पायथ्याच्या गावातून पाणी पाईपलाईनद्वारे वर आणणं फार खर्चिक काम होतं. गावची दोन - अडीचशेच्या वस्तीला पिण्याचे पाणी आणण्यासाठी एवढा खर्च करणं सरकारच्या नियमात बसत नव्हतं.

 म्हणून तळ्याचं पाणी आटलं की समस्या गंभीर रूप धारण करायची. मग दरवर्षी टँकर सुरू व्हायच्या. पण टँकर वर आणणंही अवघड होतं. कारण रस्ता हा कच्चा व खडकाळ होता. दरवर्षी हमखास एकदा तरी टँकर बंद पडायचा. टँकरचं पाणी जेमतेम पिण्यासाठी पुरायचं; पण आंघोळीसाठी व इतर कामासाठी फार काटकसरीनं वापरावं लागायचं.

 पण हे साल बरं गेलं. कारण पाऊस उत्तम झाला होता. जवळपास मार्चपर्यंत पाणी पुरलं होतं. याचं सारं श्रेय गावकरी सुनंदाच्या पायगुणाला द्यायचे.

 एप्रिल उजाडला आणि तळ कोरडे पडू लागलं. इतके दिवस सुरू असलेली पंचायतीची पाणी वाटप समिती खाडकन् जागी झाली. तिनं रेशनिंग करून पाणी वाटप करायला सुरुवात केली.

 इतके दिवस तिच्या घराच्या मते तिची दररोज चालणारी आंघोळीची चैन बंद झाली. आणि ती तगमगू लागली. एक दिवस मग तिनं खाटलंस्नान केलं. बाजेवर बसून अंगाखांद्यावर चार-सहा तांबे पाणी घेऊन अंग विसळून घेतलं. ते पाणी खाली ठेवलेल्या टोपलीत जमा झालं होतं, पण बरंचसं आजूबाजूला सांडलं होतं. तो पाहून कधी नव्हे ती तिची सासू कडाडली,

 “अगं, किती पाणी वाया गेलं जमिनीत जिरून, जरा नीट खाटलंस्नान करत जा!'

 सदानं तिची समजूत काढीत म्हटलं, “अगं आई, तिला हा प्रकार नवा आहे. हळूहळू ती शिकेल सारं!'

 ती विलक्षण शरमिंदी झाली होती.

 ‘हे खरं स्नान नाही- हे तर अंग विसळणं झालं' तिच्या मनाला उभारी येत नव्हती. त्या सर्वांच्या त्या दिवशीच्या आंघोळीनंतर जमा झालेलं पाणी वरकामाला वापरताना तिला किळस वाटली होती, पण त्यामागची मजबुरी पण ती समजू शकत होती.

 या अशा आकाशवाडीला उभं आयुष्य कसं काढयचं? हा प्रश्न जेव्हा तिच्या मनाला पडला, तेव्हा ती मूळासगट हादरून गेली होती. पण हा प्रश्न मनाचा तळाशी तिनं निग्रहानं दडपून टाकला होता.

खडकात पाणी / ७३