पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/74

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 आणि लेझीम खळखळू लागले... हलगी तडतडू लागली... शाळेची मुलं व तरणीताठी पोरं मनसोक्त नाचू लागली व पावसात भिजू लागली.

 आकाशवाडीची नवी सून - सदा गुरुजीची पत्नी गावासाठी शुभशकुनाची ठरली होती, येताना माहेरच्या गावच पाणी घेऊन आली होती.

 दुस-या दिवशी सदानं सुनंदाला गावच्या मध्यभागी असलेलं तळं पाहायला नेलं. ते लाल पाण्यानं तुडुंब भरलं होतं त्यांच्यासोबत सरपंचही होते. ते म्हणाले,

 ‘पोरी, हे आक्रीतच म्हनायचं. गेल्या अनेक वरसात पयल्या पान्यानं असं तळे भरलं नव्हतं. तू गावासाठी शकुनाची ठरलियास माये...!'

 ‘हे, हे असं पाणी तुम्ही पिता?' तिनं त्या लालतांबड्या पाण्याकडे पाहात शहारून विचारलं.

 “हो, अगं हे नैसर्गिक तळे आहे दोन दिवसात पहाशीलच पाणी कस नितळशंख होतं ते', सदा म्हणाला. 'पाणी इथं नैसर्गिकरीत्या फिल्टर होतं असं म्हटल पाहीजे....."

 आणि तिला त्याचा प्रत्यय आला. चार दिवसांनी ती हट्टानं स्वतःहून पाणी आणायला तळ्यावर आली, तेव्हा ते शांत, निळसर पाणी पाहून तिला खात्री पटत पाणी पण चवीला बरं होतं - अर्थात, कृष्णामाईच्या पाण्याची त्याला सर नव्हती म्हणा!

 हळूहळू तिला गावच्या पाणीटंचाईचा आवाका समजत गेला आणि त्यात व्यापकता पाहून ती सुन्न झाली!

 त्या विस्तीर्ण मैदानी प्रदेशात मध्येच डोंगराचा हा सुळका घट्ट पाय ताठ उभा होता. आणि त्याच्या डोक्यावर अडीच-तीन मैलाचं पठार होतं, त्याव गाव वसलं होतं. डोंगरपायथ्याचं मूळ गाव सरळ सव्वा किलोमीटर दूर होत, नागमोडी वळणानं ते सहा-सात किलोमीटर पडायचं.

 इथं पाऊणशे घराची वसती होती आणि जमिनीत पावसाच्या पाण्यावर कशीनिशी बाजरी व हलगी पिकायची. मात्र गावात पशुधन बरंच होतं. कारण डोंगरावर पावसाळ्यात काहीबाही हिरवं तरारून येतं, ते जनावरांना पुरतं! मात्र तरुण पिढी गाव सोडून मुंबई व जिल्ह्याच्या गावी नोकरी - धंद्यासाठी पळत होती.

 सदा खरं तर तालुक्याच्या गावी शिक्षक होता. पण गावात शाळा असावी गावची मुलं शिकावीत हा त्याचा ध्यास होता. त्यानं सतत खटपट करून गावात शाळा


पाणी! पाणी!! / ७२