पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/73

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 जमलेल्या साऱ्या मंडळीत उत्साहाची लाट पसरली. साऱ्यांच्या नजरा कधी आकाशात दाटी करून आलेल्या ढगाकडे तर कधी दुरून येणाऱ्या बैलगाडीकडे जात होत्या.

 गाडी सीमारेषेवर आली व थांबली. गाडीतून प्रथम उडी मारून शंकर बाहेर आला व तात्यांकडे जात म्हणाला, 'आम्ही आलो तात्या, पण नव्या वहिनीच्या वडिलांनी बरोबर पाच वाजून पाच मिनिटांनी या गावच्या भूमीवर पाय ठेवायला सांगितलंय जोड्यानी - हा शुभमुहूर्त आहे म्हणे. म्हणून थोडं थांबावं लागेल!

 ‘हात तिच्या मारी थांबू की !' सरपंच म्हणाले, 'तात्या म्या सूनबाईच्या बापाला जानतो. आमचे मोहिते अन्ना त्येंना इचारूनच विलेक्शनचा फॉरम मुहुर्तावर भरायचे......!..

 साऱ्यांची अधिरता उत्कर्षबिंदूला पोचली होती. त्या तृषार्त जनतेला पाण्याच्या समृद्ध हिरव्या प्रदेशातून आलेल्या गावच्या सुनेला पाहायचं होतं... आणि तिचा पायगुण पाहायचा होता.

 वास मंदावला होता, पण आकाशात ढगांची दाटी झाली होती.

 बरोबर पाच वाजून पाच मिनिटांनी सुनंदानं त्या आकाशवाडीचा भूमीवर पाय ठेवले. गावक-यांना हिरव्या शालूतली एक नवोठी तरुणी दिसली, त्यांच्या डोळ्यातली हिरवी स्वप्ने गडद करणारी.....

 तिनं वर आकाशाकडे पाहिलं.... आणि तिच्या तप्त चेहऱ्यावर पाण्याचा एक टपोरा थेंब पडला. ती शहारली...... आणि दूर कुठे तरी वीज कडाडली. आणि भुरभुऱ्या पावसाला सुरुवात झाली. काही क्षणांतच पावसाने जोर पकडला. पाहाता पाहाता सारेजण भिजू लागले.


 सर्वप्रथम भानावर आला तो तरणा पोलिस पाटील. त्यानं लेझीम व लगी घेऊन येणाऱ्या शाळेच्या मुलांना इशारा दिला - 'अरे, बघता काय - वाजवा रे वाजवा...!'

खडकात पाणी / ७१