पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/72

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 ‘पण दादा, या गावात जिल्हा परिषदेची शाळा सुरू झाली ती तुझ्यामुळे - चांगले तालुक्याच्या जागी होतास, पण इथं आलास - गावची मुलं शिकावी म्हणून या आकाशवाडीत कोण यायला तयार होतं.?

 “अरे, हे माझं गाव आहे. कसंही असलं तरी. मी काही विशेष केलं नाही.

 ‘पण गावाला वाटतं ना - म्हणून ते तुझ्या व नव्या वहिनीच्या स्वागताला सज्ज आहे. सरपंच - पोलिस पाटील पण स्वागताला येणार आहेत....!'

 आकाशवाडीच्या सीमारेषेवर शाळेच्या बाजूला सारं गांव जमलं होतं. सदानंदचे वडील तात्या, सरपंच व पोलिस पाटील, गावचा रेशन दुकानदार ही खाशा मंडळी होती. शाळा एकशिक्षकी होती, म्हणून तिथे एकच खुर्ची होती ती बाहेर आणून ठेवली होती, तीवर सरपंच बसले होते. बाकीची मंडळी सोयीप्रमाणे उकिडवं बसली होती वा गटागटानं उभी होती.

 दूर डोंगराच्या पायथ्याशी एक बैलगाडी वर येताना दिसली. ती तरुण पोलिस पाटलाच्या तीक्ष्ण नजरेनं नेमकी टिपली. तो म्हणाला, 'तात्या, मंडळी येताहेत- पंधरा-वीस मिनिटात ते इथं येतील.'

 तात्यांनी अधू नजरेनं डोळे ताणून पोलिस पाटलानं दाखवलेल्या दिशेनं बराच वेळ पाहिलं, पण मंद दृष्टीला सरपंचानी सजवून पाठवलेली गाडी काही दिसली ना त्यांनी काही वेळानं तो नाद सोडून देत म्हणलं, 'जाऊ दे बाबा नजर आंधळी झालीय तू पाहिलंस ना मग ठीक !'

 ...आणि वाऱ्याची एक सुसाट लाट आली, धुळीचा लोळ उठला. टळटळीत ऊन मंदावलं. आकाशात ढग आले होते काळे काळे!

 सरपंचाचा अनुभवी रापलेला चेहरा उजळून आला. आपल्या भर गलमिशा कुरवाळीत ते म्हणाले, 'तात्या म्या काय म्हणलो व्हतो- तुमची सुनबाय पान्याच्या देशातली - सकुन घिऊन इल - पघा, पघा - आकाशात ढग आल्येत. काळे काळे.... आज मिरगाचा दिस.... पाणी पडेलसं दिसतंया........

 ‘तुझ्या तोंडात साखर पडो बाबा-' तात्या म्हणाले. 'परवाच्या बेडकाच्या यात्रेनंतर काल व आज टँकरच आला नाही, पाणी नाही..... आज पाऊस पड़ला तर बहर होईल....!'

पाणी! पाणी!! / ७०