पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/68

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 हा भर दुपारचा कडक उन्हातला प्रवास-जीवाची लाही लाही होतेय. आपल्याला या कडक उन्हाची व दोन दोन दिवस स्नान न करण्याची सवय आहे पण सुनंदाचं काय?-

 या प्रश्नाचं सदाकडे उत्तर नव्हतं - म्हणूनच बसमध्ये तीन-साडेतीन तासांच्या प्रवासात तो तिच्याशी एक चकार शब्दानंही बोलला नव्हता.

 म्हसवड फाट्यावर आपले हळदीने माखलेले पाय घेऊन सुनंदा उतरली, तेव्हा दुपारचे तीन वाजले होते. तेथे एका कोपऱ्यात छप्पर घातलेली बैलगाडी उभी होती. सदाच्या हातातून ट्रंक व तिच्या हातातली वळकटी घेणारा हा आपला दीर असावा, हे तिनं अनुमानानं ताडलं.

 त्या भर उन्हात गरम चहा घेणं तिच्या जीवावर आलं होतं. तिनं हळूच नवऱ्याला विचारलं पण होतं, 'इथं चहाऐवजी सरबत नाही का मिळणार थंडगार?"

 त्यानं तिच्याकडे रोखून पाहिलं. क्षणभर ती भेदरली... आपण दीर व इतर लोकांसमोर त्याला बोललो हे त्याला आवडलं नाही का?... अशी तिच्या मनात शंका आली.

 सदाच्या नजरेत व्याकुळता दाटून आली होती. क्षणभर काय बोलावं हेच त्याला सुचेना. मग तो हलकेच म्हणाला, 'सुनंदा, हा दुष्काळी प्रांत आहे. इथं लिंबू दुर्मिळ आहे. झालंच तर इथं बर्फ कुठून आणायचा?'

 'रांजणातलं थंड पाणीही चालतं की, लिंबू नसेल तर कैरीचे पन्हं.' ती पुन्हा भाबडेपणानं बोलली.

 पुन्हा तो स्तब्ध. “कसं सांगायचं हिला? आमच्या गावात पाणी वाया जाऊ नये म्हणून पंचायतीनं रांजण किंवा माठ वापरायचे नाहीत, असा ठराव केला आहे." हा डोंगराळ माळ मुळातच निष्पर्ण आहे, झाडी बेताची, आंब्याची झाडे फारच कमी. जी आहेत, त्याच्या कैऱ्या व आंबे जिल्हा बाजारात विक्रीला जातात. कारण नापीक शेती - बाजरीखेरीज या खडकाळ भूमीत काही पिकतच नाही. तेव्हा कैरी वा अंब्याच्या विक्रीतून सुटणारा पैसा प्रपंचाला - मीठ - मिर्चीला तेवढाच हातभार लावतो... तुझ्या घरीच कितीतरी दिवसांनी सरबत घेतलं...!'


पाणी! पाणी!!/ ६६