पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/67

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ही सुनंदा वेगळीच होती. घरी सलञ्जतेनं वागणारी, आपल्या पुराणिक वडिलांच्या मर्यादित वावरणारी सुनंदा ही नव्हती. ही होती निसर्गाशी एकरूप झालेली एक लसलसती देहवेल! सदासाठी हा अनुभव अनोखा होता. त्यानं आकाशवाडीच्या शाळेत मुलांना अनेक निसर्गकविता शिकवल्या होत्या 'निर्झरास - माझ्या गोव्याच्या भूमीत • पाऊस कधीचा पडतो...' पण त्यातलं सौदर्य, जिवंतपणा व एकतानता त्याला आज सुनंदाच्या रूपानं साकार होताना दिसत होती.

 आज सकाळी सासरेबुवांनी दोघांना संगमावर पाठवून नदीची विधिवत पूजा बांधायला सांगितली होती. ही त्यांच्या घराण्याची रीत होती. तेव्हा सुनंदानं सचैल स्नान केलं होतं, त्यालाही करायला लावलं होतं.

 त्या थंडगार पाण्याच्या स्पर्शानं तो रोमांचित झाला होता, तृप्त झाला होता. पण त्याच वेळी अतृप्तीची धारदार सुरी त्याला चराचरा कापीत होती....

 तिच्या मिठीत खिडकीतून रात्री चमचमणारं चंदेरी पाणी पाहाताना अंगावर उठलेले रोमांच व आज सकाळची नदीची विधिवत पूजा- याच दोन दृश्यमालिका सदाच्या मनःपटलावर आळीपाळीने उमटत होत्या.

 आकाशवाडीत असं स्नानाचं मनसोक्त सुख गेली कित्येक वर्षे आपल्या वाट्याला आलं नाही. असे चवदार मधुर पाणी जिभेला तोषवून कधी गेलं नाही. कारण आकाशवाडीचं तळं म्हणजे पठाराच्या मध्यभागी नैसर्गिकरीत्या पडलेला मोठा खड़ा होता. त्यात पावसाळ्यात पाणी साठायचं. ते यथावकाश निवळायचं, मग ते पाणी आकाशवाडी आठ महिने पुरवून पुरवून प्यायचं. दर उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष... मग टैंकरसाठी प्रयल... तो रोज येणं म्हणजे भाग्याची परमावधी. त्याच्यापुढे उडणारी झुंबड... दोन घागरी पाणी पदरात पडणं म्हणजे लढाई मारल्याचा आनंद होता.

 कसं होणार सुनंदेचं आकाशवाडीत? कालपरवापर्यंत ही नदीकाठी वाढलेली जलकन्या पाण्याच्या अभावानं, जलाविना माशाप्रमाणे तडफडेल...

 नेमकं आपलं लग्नही मेअखेरीस झालेलं. या माणप्रांतात पाऊस पडायला जुनअखेर किंवा जुलै उजाडतो. आल्या आल्या हिनं घामानं चिक्क झालेलं अंग मोकळे करण्यासाठी स्नान करण्याची इच्छा व्यक्त केली, तर पाणी घरी असेल का? ही तर माहेरी उन्हाळ्यात तीन-तीनदा स्नान करते. आजही सकाळी सचैल न्हाली, मग संगमावर पुन्हा पाण्यात डुंबली...

|

खडकात पाणी / ६५