पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/66

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 नवऱ्याकडे तिनं पाहिलं. सदानंद डोळे मिटून बसलेला होता. तिला वाटलं हलकंच त्याला हलवावं आणि विचारावं... मनात दाटून आलेलं! आपली हुरहूर... आपली भीती...

 सदाला तिची अवस्था माहीत होती. पण तरीही तिच्याकडे दुर्लक्ष करणंच त्यानं पसंत केलं होतं. तिच्या मनात अनेक प्रश्न आहेत, तिला आपल्याला काही विचारायचं आहे, हे सदाला माहीत होतं. पण तिच्या त्या प्रश्नांची उत्तरं आपणाकडे नाहीत हेही त्याला पक्कं ठाऊक असल्यामुळे तिच्याशी तो बसमध्ये बसल्यापासून बोलायचं टाळत होता.

 तिला आपणहून थेटपणे सत्याला - वास्तव परिस्थितीला सामोरं जाऊ दे असंच त्यानं ठरवून टाकलं होतं.

 मांडवपरतणीसाठी बायकोला घेऊन जाण्यासाठी सदा कराडला परवा आला होता. दोन रात्री शृंगाराच्या खेळीतही तो मनोमन अस्वस्थ बेचैन होता. कारण समोरच्या खिडकीतून कृष्णा-कोयनेचा संगम व चांदण्यातलं चमचम करणारं पाणी तो पाहात होता आणि त्याच वेळी आपल्या आकाशवाडीचा कोरडा टिपूस पडलेला तलाव आठवत होता. पाण्याचे दुर्भिक्ष आठवत होतं. टॅन्करपुढे पाण्यासाठी उसळणारी गर्दी दिसत होती आणि सुनंदेचं नदीचं वेड स्मरून तो व्याकूळ होत होता.

 दोन्ही दिवस तिनं त्याला फिरायला नेलं ते संगमावरच. जूनचा पहिला आठवडा असूनही तिथं पाणी खळाळत होतं. मध्येच अवकाळी पाऊस दणकून झाला होता, त्यामुळे पाणी चांगलं होतं. त्याच्या डोळ्यात खळ्ळ्कन पाणी आलं होतं. आपण दुर्दैवी, आपलं गांव दुर्दैवी..... ज्याप्रमाणं विकासानं - समृद्धीनं आपल्या डोंगराच्या माथ्यावर पसरलेल्या, पठारात वसलेल्या आपल्या गावाकडे पाठ फिरवली आहे, तशीच निसर्गानंही. कोणत्या शापाचं ओझं आपले गांववाले शतकानुशतके वागवत आहेत की, का म्हणून? का?

 नदीकाठी सुनंदा लहान बाळ खेळणी दिसताच जसं फुलारून येतं, तशी उत्फुल्ल झाली होती. नदीकाठावर वय आणि नुकतंच झालेलं लग्न व सोबत असलेला नवरा विसरून धांवली होती, पाण्यात भिजली होती आणि त्यालाही तिनं धीटपणान भिजवलं होतं.


पाणी! पाणी!! / ६४