पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/65

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






५. खडकात पाणी



 कराड सुटल्यापासून बसमध्ये आपला नवरा अस्वस्थ आहे, आपल्याशी एक चकार शब्दानंही बोलत नाही, हे सुनंदाच्या लक्षात आलं होतं. पण ठासून भरलेल्या बसमध्ये जून महिन्याच्या रणरणत्या उन्हात कुकरमध्ये बटाटे उकडावेत तशी माणस गदगदत होती. सतत कपाळाचा घाम पुसून सुनंदा रडवेली झाली होती. तशात अंगात लग्नाची नवी कोरी वस्त्रं घामानं घट्ट चिकटलेली. त्यामुळे जीवाची तगमग होत होती. आईनं पाण्याची बाटली भरून दिली होती, पण त्यातलं गरम झालेलं पाणी कोरड पडलेल्या घशाची पिपासा जास्तच वाढवत होतं.

 डोंगर कापीत नागमोडी वाटांनी एस. टी. बस धावत होती. समृद्ध, हिरवा ऊस शेतीनं बहरलेला कराड तालुका मागे पडला होता. आता दुर्गम, दुष्काळी माणप्रांत सुरू झाला होता. एका तासात म्हसवड येईल. तिथून बैलगाडीनं आकाशवाडीला-सासरी जायचं आहे.

 कसं असेल आकाशवाडी गाव? जिथं आपल्याला उभा जन्म काढायचा आहे?


खडकात पाणी / ६३