पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/63

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 ‘भालेराव, ते सारं खरं, पण ठकुबाई उपासमारीनं मेली हे सत्य काही नाकारता येणार नाही आय फिल गिल्टी - मला विलक्षण शरमिंदं वाटलं....!'

 “आपण नुकतेच या खात्यात आला आहात सर! हा पहिलाच क्रायसिसचा प्रसंग आहे, पण इथं टफ झालंच पाहिजे. आणखी एक सांगतो, माझ्यापुढे म्हणालात पण चुकूनही यानंतर कुणापुढे ठकुबाईचा भूकबळी झाला असं म्हणू नका - ती अतिश्रम, आजारानं मेली, असाच आपण रिपोर्ट द्यायचा, मी तो तयार करतो व तो सारे जण मान्य करतील - कोणीही आक्षेप घेणार नाही, याची मी गॅरंटी देतो...!'

 भालेरावांनी तयार केलेला अहवाल वाचताना शिंद्यांचं मन त्यांना सांगत होतं, 'हे पांढ-यावर केलेलं काळं आहे, हा शब्दांचा खेळ आहे, रंगसफेदी आहे - खरं एकच आहे - ठकुबाईचा भूकबळी पडला आहे...!' पण मन आवरीत त्यांनी त्या रिपोर्टवर स्वाक्षरी केली.

 ‘सर, मी स्वतः हा अहवाल घेऊन कलेक्टर साहेबाकडे जातो व त्यांना सविस्तर माहिती देतो. तुम्ही रेस्ट घ्या. तुमच्या मनावर बराच ताण पडलेला आहे...!

 भालेराव जीप घेऊन कलेक्टरांकडे गेले व शिंदे घरी परतले. ‘किती उशीर हा कान्त? भूक लागली असेल ना? मी अन्न गरम करते....'

 ‘नको रेणू. मला जरा पडू दे शांतपणे. मग पाहू जेवणाचं. डोकं सुन्न झालं आहे...!'

 शांतपणे रेणू त्यांच्याजवळ आली व त्यांना तिनं पलंगावर झोपवलं व बाम घेऊन त्यांचे कपाळ आपल्या नाजूक - गो-यापान हातांनी हळुवारपणे चोळू लागली.

 तिचं निकट सान्निध्य व तिचा हळुवार स्पर्श मात्र आज त्यांच्या क्षुब्ध मनाला सांत्वना देण्यास असमर्थ होता. तिचा गोरापान हात पाहाताना न पाहिलेल्या ठकुबाईचा वाळलेला कष्टानं रापलेला हात त्यांच्या नजरेसमोर येत होता.

 ...आणि जागच्या जागी अस्वस्थपणे ते क्षणाक्षणाला कूस बदलत होते, वा हात आपल्या कपाळावर घट्ट दाबून धरीत होते... तरीही ते शांत होत नव्हते. त्यांचा क्षोभ कमी होत नव्हता...!

☐☐☐

भूकबळी / ६१