पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/62

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 एका घंटयामध्ये जीप परत आली. आणि तहसीलदारांच्या चेंबरमध्ये हात जोडीतच शर्मा दुकानदाराने प्रवेश केला, 'जय रामजी की! त्यांच्यासमवेत गावचे सरपंच होते.

 शिंद्यांनी त्यांना चांगलेच फैलावर घेतलं. शर्माला पाहताच त्यांचा सारा क्षोभ व संताप उफाळून आला, 'लाज वाटली पाहिजे तुम्हाला शर्माजी, खुशाल आठ आठ दिवस दुकान बंद ठेवता, मजुरांना कुपनावर धान्य देत नाही - होत नसेल दुकान चालवणं तर राजीनामा द्या!'

 'रावसाहेब, माझं दुकान बंद नव्हतं. माझ्या मुनिमाकडे माझ्या गैरहजरीत दुकान चालवण्याचे अधिकारपत्र आहे. मी बालाजीला गेलो असता त्यांनी काळगाव दिघीमध्ये वाटप केलं होतं. पाहिजे तर तुम्ही रेकॉर्ड तपासा, या सरपंचांना विचारा हुजूर... आम्ही कधीही दुकान बंद ठेवलेलं नाही. रोज वाटप चालू आहे. राघू कधी दुकानावर आलाच नाही!"

 पुन्हा एकदा तीच हताशता शिंद्यांना जाणवली. शर्मानी रेकॉर्ड नीट ठेवलं असणार यात काहीच शंका नव्हती. पुन्हा त्यांना सरपंचाची साथ होती, त्यामुळे तपासात दुकान बंद होतं हे निष्पन्न होणं रेकॉर्डवर तरी शक्य नव्हतं.

 त्याचं दुकान सस्पेंड केलं तरी काही दिवसांनी तो सहसिलामात खात्रीपूर्वक सुटला असता...!

 'आणि हुजूर, बोरसरचं दुकान नुकतंच आपण सस्पेंड केलंय. ते काळगाव दिघीला म्हणजे माझ्या दुकानाला जोडलंय - ते पत्र परवा तलाठ्यानं आणून दिलय मुनिमाकडे - पत्राच्या ओ. सी. वर त्यांची सही व तारीख आणि तलाठी अप्पाचा तामिली रिपोर्ट पहा - त्याप्रमाणे काल त्यांनी चलनानं पैसे भरले व आज गोडाऊनकडे मेटॅडोर पाठवलाय साहेब धान्य आणण्यासाठी...!'

 शर्माच्या राज्यात सारं काही आलबेल होतं, हाच याचा मथितार्थ होता. शिंद्यांना काही बोलणं शक्य नव्हतं.

 ते सारे गेल्यानंतर भालेराव म्हणाले, 'सर, मी वयाच्या वडिलकीनं सांगतो. आपण एवढा त्रास करून घेऊ नका जिवाला. तुमचा काहीएक दोष नाही. प्रत्येक कार्यकारी यंत्रणेचे काही नियम असतात, त्याप्रमाणे ते काम करतात. रांजणीला कुटुंब राहिलं असतं तर हा प्रकार घडलाही नसता, पण शेतक-यांनी अडविल्यावर जबरदस्तीन कामही करता येत नाही - पाटील साहेबाविरुद्ध रिपोर्ट करता येईल - पण त्यांच्या खातेनिहाय चौकशीत ते जरूर सुटतील!'

पाणी! पाणी!! / ६०