पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/61

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 शिंद्यांनी वैतागानं आपली मूठ टेबलावर आदळली, पण त्यामुळे त्यांच्या हाताला झिणझिण्या आल्या एवढंच. ते हतबुद्ध होऊन ऑफिस सुपरिंटेंडंटकडे पाहात राहिले.

 दर आठवड्याला शुक्रवारी सांयकाळपर्यंत कलेक्टर ऑफिसला रोजगार हमी कामाचा आठवडी अहवाल तहसीलदारांना सादर करणे बंधनकारक असते. त्यासाठी सर्व कार्यपालन यंत्रणांनी गुरुवारी सायंकाळी किंवा शुक्रवारी सकाळी त्यांच्या खात्यामार्फत कोणती रोजगार हमीची कामे चालू आहेत व कोणती बंद आहेत हे लेखी कळवायचं असतं. बऱ्याच वेळी प्रत्यक्ष काम करणाऱ्या मस्टर असिस्टंट किंवा ज्युनिअर इंजिनिअर्सकडून वेळेवर अहवाल प्राप्त होत नाहीत, म्हणून मागच्या आठवड्याचा रिपोर्ट रिपीट केला जातो. इथं हाच प्रकार घडला होता. प्रत्यक्ष काळगाव दिघीत वर्षापासून बंद पडलेलं पाझर तलावाचं काम सुरु झालं होतं. तरीही त्याची माहिती कार्यालयात वेळेवर न आल्यामुळे ते काम बंद असल्याचं साप्ताहिक अहवालात नमूद केलं गेलं. ही माहिती तपासण्याची यंत्रणा तहसीलदाराकडे नसते, त्यामुळे कार्यालयात यंत्रणेची माहिती ग्राह्य धरून जिल्ह्याला व जिल्ह्यातून शासनाकडे अहवाल पाठवला जातो.

 ‘इथंही नेमकं हेच घडलं होतं काम चालू असूनही माहिती न प्राप्त झाल्यामुळे ते काम बंद आहे' असं अहवालात नमूद केलं गेलं आणि त्या माहितीच्या आधारे राघूला रांजणीला दूरवर कामावर जाण्यासाठी शिंद्यांनी हुकूम दिला होता. त्याच्या गावात काम सुरू होतं, पण ते कुणालाच माहीत नसल्यामुळे राघूला व त्याच्या बहिणीला रांजणीला बरं नसताना जावं लागलं होतं.

 जर काळगाव दिघीचं काम सुरू असल्याचं माहीत झालं असतं, तर राघूच्या बहिणीला सहा किलोमीटर रांजणीला जाण्याचे व परत येण्याचं काम पडलं नसतं व कदाचित तिचा बळीही गेला नसता.

 त्याच वेळी बंडिंगचे गोसावी आले त्यांनी राघूनं जी माहिती रांजणीच्या कामाबद्दल सांगितली होती तिला दुजोरा दिला. त्यांचाही काही दोष नव्हता, असेल तर परिस्थितीचा व ठकुबाईच्या गरिबीचा होता.

 शिंद्यांची मात्र घुसमट होत होती. मनोमन ते विलक्षण क्षुब्ध होते. जिवाला तीव्र टोचणी लागून राहिली होती. या भूकबळीला एक शासकीय अधिकारी म्हणून मीच जबाबदार आहे.


भूकबळी / ५९