पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/60

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


चाललो होतो. रस्त्याच्या शेजारी हा राघू व त्याचे कुटुंब भेटलं ठकुबाई तिच मृतावस्थेत पडलेली...!'

 वर्तमानपत्रात 'ठकुबाईचा भूकबळी' या मथळ्याखाली आलेल्या बातमीचा उलगडा आता शिंद्यांना झाला होता. त्यांच्या नजरेसमोर न पाहिलेल्या ठकुबाईचा चेहरा भूक आणि वेदनेचं रूप घेऊन येत होता आणि त्यांचं मन अस्वस्थ बेचैन होत होतं!

 पण त्यांना असं स्वस्थ बसून भागणार नव्हतं. प्रयलपूर्वक त्यांनी मन शांत केलं आणि पेशकाराला बोलावून सांगितलं, 'जीप घेऊन जा - काळगावच्या दुकानदाराला गाडीत घालून आणा...! तसंच त्यांनी भालेरावला सांगून तालुक्याचे दोन्ही डेप्युटी इंजिनिअर बंडिंगचे मृदसंधारण अधिकारी यांना फोन करून बोलावून घेण्यास सांगितलं.

 इरिगेशनचे डेप्युटी इंजिनिअर पाटील रामपूरला राहात व इथे तालुक्याला येऊन - जाऊन करीत. आजही ते अपेक्षेप्रमाणे कार्यालयात नव्हते. कसल्यातरी मिटिंगसाठी जिल्ह्याला गेले होते. त्यांचा ऑफिस सुपरिंटेंडंट आला व त्यानं हे सांगितलं.

 "पण सर, काळगावचं तर काम सुरू झालं आहे. तिथं मजुरांची उपस्थिती फारच कमी आहे. तिथे हे आले असते तर हा प्रकार झाला नसता!"

 शिंदे चकित व त्याचबरोबर उद्विग्न झाले! राघूच्या गावातच बंद पडलेल्या पाझर तलावाचं काम सुरू होतं आणि तरीही त्यांनी राघू व त्याच्या मृत झालेल्या बहिणीला रांजणीला पाठवलं होतं व चालण्याचे श्रम सहन न होऊन ती वाटेतच मेली होती.

 त्यांनी क्षुब्ध नजरेनं भालेरावकडे पाहिलं, तसे ते चाचरत म्हणाले, 'सर, मागच्या आठवड्याच्या वीकली रिपोर्टमध्ये काळगाय दिघीचं पाझर तलावाचं काम बंद असल्याचे पाटील साहेबांनीच दाखवलं होतं.

 ‘बरोबर आहे सर-' इरिगेशनचा ऑफिस सुपरिंटेंडंट मान खाली घालून म्हणाला, 'काम मागच्या आठवड्यात सुरू झालं होतं. त्यासाठी पाटील साहेब गावात गेले होते. संबंधित शेतक-यांची समजूत घालून संमती घेतली व काम सुरू केलं होतं'

 ‘पण वीकली रिपोर्टमध्ये ते का आलं नाही'? आवाज चढवीत शिंदे म्हणाले.

 ‘त्याचं असं आहे सर, काम सुरू झाल्याचं मला ऑफिसमध्ये माहीत नव्हतं, मागच्या गुरुवारी काम सुरू करून पाटील साहेब डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टरला इ. इ. साहेबांनी बोलवलं म्हणून परस्पर गेले. शनिवार - रविवार सुट्टी होती जोडून - ते थेट सोमवारीच आले, पण दर शुक्रवारी रिपोर्ट करायचा असतो आपल्याकडे कामाचा, म्हणून मी मागच्या आठवड्यात रिपोर्ट तसाच रिपीट केला...'


पाणी! पाणी!! / ५८