पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/56

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


लावलं. पाटलाचा बाप माळकरी होता. त्याने दोन पसे बाजरी दिली. तेवढाच पोटाला दोन दिवस आधार झाला.

 अशातच वणवणताना राघूला विसपुते भेटले. त्यानं संकोचानं रामराम घातला, तसे खुश होऊन त्यांनी राघूची अघळपघळ चौकशी केली आणि त्याचा प्रश्न जाणून घेतला. त्याच्याकडून निम्मी कुपनं घेऊन पन्नास रुपये दिले व एका फॉर्मवर अंगठा घेतला व आपल्या मोटारसायकलवर मागे बसवून त्याला तहसील कचेरीत नेलं. तिथे त्याच्यासमक्ष तो अर्ज रावसाहेब शिंद्यांना दिला. त्यांनी लगोलग त्याला रांजणीच्या बंडिंगच्या कामावर जाण्याचा हुकूम दिला.

 विसपुते तालुक्यालाच राहात असल्यामुळे त्याला एस. टी. चे पाच रुपये खर्चून परत यावं लागलं. पण त्यांनी दिलेल्या पैशातून राघूनं दोन दिवस पोटापाण्याची सोय केली.

 मग रात्री त्यानं हा विषय मैना व ठकुबाईपुढे काढला,‘कारभारणे, रांजणी चागंली चार - सा कोस हाय पग जायला. पन तितं जायला पाहिजे, नाय तर जगण कठीण हाय बघ.'

 ‘जाऊ की कारभारी-पण ननंदबायला यवढं चालणं झेपेल का? काल सांजेपास्नं त्येच आंग मोडून आलंया आन् गरमबी जालंय...'

 'मैनानं विचारलं तसा काहीसा गहिवरून राघू म्हणाला,

 ‘व्हय-म्या पघतो ना- ठकुबाय लई बीमार हाय, पन् म्या असा करटा भाऊ--जो भणीचं दवादारू करू नाय शकत. आसं कर ठकुबाय - तु पोरास्नी घिऊन इथचं रहा -एक हप्त्यानंतर म्या तुला नेतो.'

 ‘नाय दादा - म्या बरी हाय -- म्या येते तुमासंगट- तेवढीच रोजी पदरी पडेल.. जायला जरा येळ लागेल - पन म्याबी येते दादा --' ठकूबाई संकोचून म्हणाला.

 राघू व मैना दोघांनाही तिची प्रकृती माहीत होती; पण प्रश्न रोजीचा होता, जगण्याचा होता, त्यांनी तिथंच विषय संपवला.

 दुस-या दिवशी सकाळी भाकर-तुकडा फडक्यात बांधून ते मुलासह निघाले, रांजणीला जाणारा रस्ता रेशन दुकानावरून जाणारा होता त्याने थोडं थांबून चौकशी केली, पण अजूनही बालाजीला गेलेले शर्मा दुकानदार परत आले नव्हते. त्याच्या नातवाचं जावळ व बारसं तिथं होतं, असं घरातल्या मुनिमानं सांगितलं तेव्हा अजिजीन त्यानं म्हणलं,

 ‘पन मुनीमजी, तुमी दुकान उघडाना. मह्या जवळ लई कुपनं हायती गव्हाची ती त्यवढी मोडून दिवा की - पोरंबाळं आन् भण भुकेली हायत हो...'


पाणी! पाणी!! / ५४