पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/54

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 मुळात तालुकाच डोंगराळ, म्हणून कठीण, खडकाळ जमीन, तिथे नैसर्गिक पाण्यावर बाजरीखेरीज काही पिकायचं नाही. बाजरीचं पीकही दुष्काळात पुरेसं येत नाही. यावर्षीही असंच झालं. पावसाळा लांबला. मृग पूर्ण कोरडा गेला, त्यानंतर दोन जेमतेम पाऊस झाले. त्यावर कशीतरी तीन क्विंटल बाजरी पदरात आली. त्यातली एक बाजारात दरवर्षीच्या शिरस्त्याप्रमाणे पडत्या भावात ताबडतोबीने विकून आलेल्या पैशात किरकोळ उधार - उसनं देणं व मीठ - मिरचीची तरतूद करणं भाग होत. उरलेले धान्य राघू, त्याची बायको व दोन मुले आणि विधवा होऊन त्याच्याकडेच राहायला आलेली बहीण ठकूबाई एवढ्या प्रपंचाला कितीस पुरणार? दिवाळीला तर त्यातला एक कणही राहिला नव्हता.

 दरवर्षी शेजारच्या रामपूर तालुक्यात तो सर्व कुटुंबकबिल्यासह साखर कारखान्यावर उसतोडीला जायचा. यंदा ऊसही पावसाअभावी कमी झालेला, म्हणून फेब्रुवारीतच गळीत हंगाम संपला. ठेकेदाराकडून परततानाच पुढील वर्षाची आगाऊ रक्कम घेतली, तीही हां हां म्हणता संपून गेली आणि त्या कुटुंबाला आता रोजगार हमीच्या कामाखेरीज जगण्यासाठी दुसरा मार्ग नव्हता.

 राधूनं कामासाठी शोधाशोध सुरू केली, तेव्हा सुदैवानं शेजारच्या गावी तांड्याला जोडणा-या जोडरस्त्याचे काम नुकतंच सुरू झालं होतं. या काम आवश्यकता असूनही जास्त मजूर मिळत नव्हते. कारण डोंगराळ भाग असल्या जवळपास माती नव्हती, खडक होता. तो फोडणं अवघड काम होतं.

 याचा प्रत्यय राधूला व त्याच्या पत्नीला - बहिणीला आला. पहिल्याच दिवशी खडी फोडून हाताला फोड आले होते. पण इतर कामापेक्षा मजुरीचे दर जादा होते. आसपास दुसरे कोणतेही कामे सुरू नव्हते. म्हणून शरीर साथ देत नसतानाही त्या कामावर जाणे भाग होते.

 घरधनी गेल्यानंतर पांढरं कपाळ घेऊन भावाकडे आल्यानंतर त्याच्या कमीत कमी भार पडावा म्हणून अहोरात्र राबणं, रानात कामाला जाणं व उपासाच्या नावाखाली एकदाच दुपारी भाकर तुकडा खाणं, त्यामुळे ठकुबाई कमालीची रोडावलेली होती. तिला हे खडी फोडण्याचं काम झेपणारं नव्हतं. पहिल्या आठवड्यानंतर रोजगाराचं वाटप झालं, तेव्हा तिची मजुरी तिच्या भावजयीपेक्षा अर्धीच भरली होती. ‘वयनी, काय करू बघा' कपालीचं कुंकू गेल्यानंतर कुडीत जीवच नाय राहिला..'

 राघूची बायको मैनाचे गावातल्या व समाजातल्या बायका कान फुंकत असल्यातरीं, जात्याच प्रेमळ असल्यामुळे तिला ठकुबाईकडे पाहिलं की पोटात कसतरी व्हायचं. आपल्याच उमरीची ही आपली नणंद. कुंकवाचा आधार गेला आणि बिचारीची


पाणी! पाणी!! / ५२