पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/53

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ‘आपल्या पंचायतीमार्फत काम मागण्यासाठी अर्ज केलेल्या राघूच्या बहिणीचा भूकबळी झाल्याची वार्ता आलीय पेपरमध्ये. तुम्हाला काही माहीत आहे त्याबद्दल...?!

 ‘वा ! माहीत तर आहे. अहो कालच मला पेपरचा वार्ताहर किनाळकर भेटला होता. त्याला मीच सांगितलं हे! तसचं राघूही होता माझ्या बरोबर -!

 ‘विसपुते...!' तीव्र स्वरात शिंदे म्हणाले, 'हे... हे मला सांगता आलं नसतं तुम्हाला मी कधी तुमची भेट चुकवली आहे? किंवा सांगितलेल्या कामासंबंधी कार्यवाही केली नाही? तरीही...'

 ‘त्याच असं आहे रावसाहेब, गेले दोन दिवस तुम्ही सतत दौ-यावर होता साक्षरता अभियानाच्या कामासाठी. मग कशी भेट व्हायची?' विसपुते म्हणाले, “अहो, इथे दुष्काळात लोकांचे हाल आहेत आणि शासनाला हे काहीतरीच खूळ सुचतंय.. आधी हाताला काम द्या, पोटाला भाकरी द्या व मग त्यांना शिकवा.'

 आपल्याला विसपुत्यांनी आधी का कळवलं नाही हे खोलात जाऊन विचारण्यात आता काही अर्थ नव्हता व त्यांचा साक्षरता अभियानावरील रागही त्यांना माहीत होता.

 'ठीक आहे. पण मी त्यांना रांजणीच्या नालाबंडिंगच्या कामावर पाठवलं होत.'

 ‘त्याचं असं झालं साहेब...' जरा पुढे सरसावत विसपुते म्हणाले, 'इथे माझ्या सोबत राघू आहे. तो बाहेर उभा आहे, तोच तुम्हाला सांगेल.'

 राघू जेव्हा त्यांच्यासमोर आला, शिंद्यांच्या मनात एक अपराधी भाव चमकून गेला. आपण याच्या बहिणीच्या भूकबळीला जबाबदार आहोत, असं त्यांना वाटत होतं.

 त्यांनी राघूकडे निरखून पाहिलं - मध्यम वय, अंगावर मळकट धोतर व सदरा, दाढी वाढलेली, रापलेला काळाकभिन्न चेहरा, त्यावर सुन्नतेचा लेप...!

 ‘राघू... काय झालं बाबा? मी तर तुला व तुझ्या घराच्यांना रांजणीच्या कामावर पाठवलं होतं ना?'

 ‘तेचं आसं हाय सायेब...' अडखळत राघू सांगू लागला...

 राघू ननावरे गाडीलोहार या भटक्या जमातीत मोडणारा. पण जहागीरदार किशनदेव रायांनी निजामाच्या आमदानीत त्याच्या आजोबाला बैलगाडी बनवण्याच्या कसबावर खुश होऊन काळगाव दिघी परिसरातली पाच एकर जमीन दिलेली. आज वाटण्या होऊन राघूच्या वाट्याला जेमतेम दीड एकर आलेली.


भूकबळी / ५१