पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/52

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 आता शिंद्याना थोडासा उलगडा झाला होता. त्यांच्याकडे राघूनं ‘शेतकरी व शेतमजूर पंचायती' मार्फत कामाच्या मागणीसाठी लेखी अर्ज दिला होता, पण काळगाव दिघी पॉकेट मध्ये, ज्यात चार ग्रामपंचायतीचा समावेश होता, एकही काम चालू नव्हते. एक पाझर तलाव मंजूर होता, त्याच्या एका भरावाचं कामही मागच्या वर्षी पूर्ण झालं होतं. त्याचा दुसरा भराव शेतक-यांनी अडवला होता व भूसंपादनाची कार्यवाही अपूर्ण होती. शेतक-यांना किमान ऐंशी टक्के मोबदला, अॅडव्हान्स हवा होता. त्यासाठी स्वतः शिंदे प्रयत्नशील होते. पण शासनाकडून पतमर्यादा न आल्यामुळे तो देता येत नव्हता व त्यामुळेच हे पाझर तलावचे काम बंद पडले होते.

 म्हणून त्यांनी सहा किलोमीटर अंतरावर नाला बंडिंगचे एक काम चालू होते, तिथे राघू व त्याच्या कुटुंबियांनी जावे असे लेखी आदेश दिले व त्याची एक प्रत शिपायामार्फत बंडिंगचे अधिकारी चव्हाण यांनाही पाठवली.

 आज राघूची बहीण ठकूबाईचा भूकबळी पडला होता. कागदावर तर शिंद्यांनी सर्व सोपस्कार पूर्ण केले होते. तरीही कुठेतरी काहीतरी चुकतेय, ही त्यांची टोचणी कमी होत नव्हती.

 ‘राम राम रावसाहेब...'

 शिंद्यांनी पाहिलं, विसपुते आले होते. त्यांनी अभिवादन स्वीकारून त्यांना बसायला सांगितलं.

 ‘मी आज तुम्हाला भेटणार होतोच. पण तुमचं पकड वॉरट आलं शिपायामार्फत म्हणा ना, मग काय करता? तसाच आलो... झालं !' आणि विसपुते गडगडाटी हसले.

 तसं कारण काहीही नव्हतं, पण शिंद्यांना विसपुते हा पहिल्यापासूनच आवडला नव्हता. त्याचं अघळपघळ बोलणं, गडगडाटी हसणं आणि त्याचे मांजरासारखे हिरवे - घारे डोळे. सारचं त्यांना खटकायचं. वाटायचं हा ज्या शेतकरी व शेतमजूर संघटनेचं काम करतोय, तिथं हा शोभत नाही, ही ती संघटना आपल्या पुढारीपणासाठी वापरतोय. त्याला शेतकरी व शेतमजुरांच्या प्रश्नांशी काही देणं - घेणं नाही. खर तर हा त्यांचा स्वतःचा, व्यक्ती पाहून झालेला ग्रह होता. त्याला काही ठोस आधार पुरावा नव्हता.

 पण आज मात्र शिंद्यांची खात्रीच झाली की, आपला हा ग्रह चुकीचा नाही कारण आज त्यांना आपण का बोलावलं आहे हे माहीत असणारय. तरीही ते गडगडा हसत होते... कारण नसताना व विनोदाचं प्रयोजनही नसताना.


पाणी! पाणी!! / ५०