पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/47

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे४. भूकबळी ‘सर - कलेक्टर साहेब लाईनवर आहेत'
 टेलिफोन ऑपरेटरने सांगितलं, तेव्हा तहसीलदार शिंदेची झोप खाडकन उडाली व ते घाईघाईने म्हणाले ‘जोडून दे.'

 काल रात्री त्यांना झोपायला बराच उशीर झाला होता, काल दिवसभर त्यांनी साक्षरता अभियानाच्या प्रचारासाठी दहा-बारा खेड्यांना भेटी देऊन मिटिंगा घेतल्या होत्या व शेवटी मांजरीला सरपंच व साक्षरता अभियानाच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव त्यांनी बसवलेल्या कलापथकाच्याही कार्यक्रमाला थांबले होते. साहजिकच घरी परतायला रात्रीचा एक वाजून गेला होता व आज जाग आली तेव्हा आठ वाजून गेले होते..

 मूड अजूनही आळसावलेलाच होता. रेणुकेनं दोनदा बजावूनही शिंद्यांनी अद्याप ब्रश केला नव्हता. त्यांची बेड - टीची सवय लग्नानंतर तिने मोडून काढली होती. आजही तिनं तेच बजावलं होतं, ‘ब्रश केल्याशिवाय चहा मिळणार नाही' पण उठावसं वाटत नव्हतं, ते तसेच पडल्या पडल्या कालची वृत्तपत्रे वाचत होते. त्यांच्या तालुक्याला जिल्हा व प्रमुख वृत्तपत्रे सायंकाळी चारला येत असत. कारण मुख्य रस्त्यापासून तालुका दूर होता. त्यामुळे रोज सकाळी ताजी वृत्तपत्रे वाचायचा आनंद शिंद्यांना इथे तहसीलदार म्हणून नेमणूक झाल्यापासून मिळत नव्हता. तेव्हा सायंकाळी आलेले पेपर्स रात्री ऑफिस किंवा दौरा करून आल्यानंतर वाचणे किंवा परतायला खूप उशीर झाला तर दुसऱ्या दिवशी वाचणे व्हायचे.


भूकबळी / ४५