पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/45

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 ' ही गजरा नकोच होती तुम्हाला कधी... पाहिजे होतं ते तिचं शरीर! ते हाडकलं आणि तुम्ही बाजार जवळ केला!' गजराचा आवाज कापत होता, ‘धनी, आज बाजार जवळ केला... उद्या घरी सवतपण आणाल. परवा मला घराबाहेर पण काढाल...'

 ‘छे, छे ! असं कसं होईल?'

 ‘न व्हायला काय झालं? तुम्ही बाजारात सुख हुडकाल, हे तरी कुठं वाटलं होतं?...' गजरा म्हणाली.

 ‘मला कामावर गेलंच पाहिजे. कष्टाची सवय ठेवली पाहिजे. कारण मला केव्हाही घराबाहेर काढलं जाईल. या घराचा, या घरधन्याचा काही भरवसा देता येत नाही. माझा आधार तुटलाय, तेव्हा मला माझ्या पायावर उभं राहिलंच पाहिजे. संसारात जोडीदाराला जेव्हा फक्त बाईचा देहच पाहिजे असतो, त्या बाईसाठी तो संसार कुचकामी आहे. त्यात अख्ख्या जिंदगीचा आधार शोधता येत नाही, सापडत नाही... या रोजगार हमीच्या कामानं अशा बायांना... ज्यात मी सुदिक आहे... आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहायची ताकद दिली आहे... मार्ग दिला आहे, तो मला सोडून चालणार नाही...'

 ...आणि ती कामासाठी घराबाहेर पडली.

☐☐☐


बांधा / ४३