पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/38

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


देवदर्शनाला किंवा लगीन - हळदीकुंकवाला, पण हे अस्मानी संकट आलं आणि हे असं विपरीत झालं...'

 भिंतीला लगटून गजरा किंचित ओणवी आपल्याच विचारात होती - 'मी - मी घराबाहेर पडले ते व्यंकूनं - पोटच्या गोळ्यानं भुकेसाठी रडणं सुरू केलं तेव्हा - घरी दूधच काय, पण भाकरीचा तुकडाही शिल्लक नव्हता. आणि हे धनी, तुम्हाला सांगून तरी काई उपेग झाला नसता. तुम्ही इनामदारीच्या तोऱ्यात. निसर्गाची कृपा होती - ऊस शेती होती तेव्हा हा तोरा खपून गेला. पण अतिपाण्यानं जमीन खारायली - फुटली. ऊस पिकेना. आणि मग लागोपाठ तीन वर्षे दुष्काळ, विहीर पण आटली. गतवर्षी जेमतेम हायब्रीड पदरी पडली...'

 चांदण्यासारख्या दाणेदार ज्वारीची पांढरीशुभ्र भाकर खाण्यास चटावलेली जीभ हायब्रीडची काळपटलेली जाड भाकरी पाहून रसना पाझरायची विसरली. पण भुकेच्या आगीनं लोचट होऊन ती त्यालाही नंतर सरावली म्हणा !  असा हा दुष्काळाचा फटकारलेला आसूड. त्यात दुसरी विहीर खोदताना खडक लागल्यामुळे बोकांडी बसलेलं बँकेचं कर्ज. त्यांनीही ताठर धोरण स्वीकारून जमिनीचा लिलाव पुकारला वसुलीसाठी. स्त्रीधन म्हणून आलेला काळ्या आईचा पाच एकराचा तुकडा बेभाव गेला, तेव्हा गजरा ओक्साबोक्सी रडली होती - पित्याचं मायेचं पांघरूण उडालं जाऊन ती जणू उघडी पडली होती...

 "धनी - या अस्मानी सुलतानीनं भल्या - भल्यांची जिरली, पण तुमचे पाय जमिनीवर कधी आलेच नाहीत. कष्ट करायची, राबायची सवयच नाही तुमास्नी. त्याची लाजबी वाटते... म्हणून मला डोईवरचा पदर न घसरणा-या गजराला ओचा मारून रोजगार हमीच्या कामावर मजूर म्हणून जावं लागलं ! घरचा धनी जेव्हा घरट्यातल्या पाखरासाठी घास कमवीत नाही, तेव्हा बाईला आपली मानमर्यादा विसरून पुढे यावं लागतं... यात माझं काय चुकलं?...'

 गजरा आपल्या निर्णयाबद्दल या दुख-या अवस्थेतही ठाम होती - तरीही सवाल होताच - मग हा बोल का? हा आपला बाईपणाचा अपमान का? ‘हाडंहाडं लागत आहेत - पूर्वीसारखी मजा येत नाही...'

 विरलेल्या खणाची चोळी दंडाला सैलावली होती. गुलाबी हात कामानं करपले होते, घट्ट झाले होते. डौलदार बांधाही आक्रसला होता !

 हे... हे बदललेलं रूप हणमंताला रुचेनासं झालं आहे !

 गजरानं पुन्हा एकदा स्वतःकडे नजर टाकली...


पाणी! पाणी!! / ३६