पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/37

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


दोन्ही हाडकल्यामुळे निकामी ठरल्या होत्या, हेच सत्य त्यान काल रात्री बोलताना ठसठशीतपणे अधोरेखित केलं होतं.

 तिच्या मनावर मणामणाचे ओझे दाटून आले होते. जीवाच्या कराराने पाझरण्याऱ्या सीमेपर्यंत पोचलेले आपले डोळे ती कोरडे राखायचा प्रयत्न करीत होती.

 कारण जो दिवस कष्ट व श्रमाची एक प्रदीर्घ वाटचाल घेऊन आला होता, त्याची सुरुवात अशी पाझरलेली गजराला परवडणारी नव्हती. चव्हाणांच्या त्या गढीसमान वाड्याची झाडलोट, अंगणसडा, सर्वांचं चहापाणी, मग भाकऱ्या थापणं... कितीतरी कामं तिला यंत्रवत गतीनं उरकायची होती. तीन वर्ष सतत दुष्काळाच्या तडाख्यानंतर वाड्यावरचा गडी व बाईमाणूस तिनंच कमी केले होते. त्यामुळे वरकडीची सारी कामे तिलाच पाहावी लागत होती. आणि हे सारं करून दोन किलोमीटरवर चालू असलेल्या रोजगार हमीअंतर्गत पाझर तलावाच्या कामाला तिला साडेआठच्या ठोक्याला हजेरी लावायची होती...

 पाच वर्षांपूर्वीची गोष्ट. अमाप पिकलेल्या उसामुळे जेव्हा वाड्यात लक्ष्मी प्रसन्नतेनं संचारत होती, तेव्हा हणमंतानं हौसेनं तिला शहरातून घड्याळ आणलं होतं - स्वयंचलित आकड्यांचं. त्याच्या जोरावर ती कामावर वक्तशीर पोचत असे. पण त्यामुळे सुरुवाती सुरुवातीला तिची प्रचंड टिंगलही झाली होती. तो हलकट मुकादम तिला फिदीफिदी हसत म्हणायचा, 'तालेवाराची बाई तू - घड्याळ लावून कामावर येतेस! कशाला उगीच एका जीवाचा रोजगार बुडवतेस ?...'

 खानदानी मराठा संस्कारात वाढलेल्या गजराला ते मनस्वी लागायचं. पण परपुरुषाशी फटकन काही बोलावं हा तिचा स्वभावच नव्हता. तेव्हापासून तिनं ते घड्याळ वापरणंच सोडून दिलं होतं! पण घरातून आठ ते आठ पाचला निघायचं, हा तिचा परिपाठ होता, ज्यायोगे ती कामावर वेळेवर पोचायची...

 पण रोज सकाळी आठाकडे झुकणारे ते घड्याळाचे काटे पाहिले की, तिला वाटायचं - हे घड्याळ उचलून फेकून द्यावं. नको ती धावपळ, नको ते कामावर जाणं आणि नको ते उरस्फोडी काम... ज्यामुळे शरीर सुकत चाललेय... मांसलता कमी होत चाललीय...

 ‘धनी.. ते काय बोलून गेलात तुम्ही ?' तिच्या मनावर उठलेला हा दुसरा ओरखडा. 'जीव कसनुसा झाला बघा. पण तुम्हास्नी काय हो त्याचं ? आपलं पाठ फिरवून खुशाल घोरत पडल्यावर कसं कळावं ? गरीब ग्रामसेवकाची पोर असले तरी पण माहेर खानदानी आहे धनी. तिथली पण रीत हीच होती. घराबाहेर पडायचं ते


बांधा /३५