पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/33

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पोलिसांना सांगेन.... पण तुमचं काय? तुम्ही गावापासून अलग पडाल आणि अलग पडून - फटकून तुम्ही जगू काल?'

 टी.व्ही.वर पाहिलेल्या 'महाभारत' या मालिकेतील चहुबाजूंनी कौरवांनी घेरलेल्या व कोंडी झालेल्या अभिमन्यूची महादूला आठवण झाली. आपलीही आज तीच अवस्था झाली आहे. अभिमन्यू तर खैर मरून गेला, पण आपल्याला मरताही येत नाही. हे जिवंत सामाजिक मरण त्याहून भयंकर आहे.

 ‘साहेब, सैन्यात महार रेजिमेंटचं नाव गौरवानं घेतलं जातं; कारण त्यांचा इतिहास हा पराक्रमाचा - लढायांचा व देशप्रेमाचा आहे ! तेथे महार हे आदरार्थी नाव आहे, पण इथं माझ्या गावी, कार्यवाही पण करीन. तुम्ही बोट दाखवाल त्या एके भारतातील खेड्यात ती शिवी आहे, शाप आहे. तो शाप वाहातच रोज थोडं थोडं मरत का होईना जगायचं आहे. पण... पण मी लढवय्या आहे तहसीलदार साहेब. मी लढणं जाणतो - हार-जितीची पर्वा नाही करत ! आणि ही हरणारी लढाई आहे, तरीही लढेन...'

 संतापानं आणि वेदनेनं महादूचा आवाज थरथरत होता. त्याचा कणखर लष्करी देहपण कापत होता.

 ‘शांत व्हा कांबळे, शांत व्हा. मी तुमची भावना समजू शकतो. पण तहसीलदार म्हणून रोजगार हमीचं काम पुरवणं माझं कर्तव्यच आहे. त्यासाठी...'

 ‘पुरे साहेब, तुमच्या दिलाशाची मला आवश्यकता नाही. स्वतःला सावरीत घसा खाकरत महादू म्हणाला,

 ‘सीमेवर लढताना जीव झोकून लढायची सवय आहे या सैनिकाला साहेब. तिथं काश्मिरात - सायचीनमध्ये लढताना देशावरून जीव ओवाळून टाकला होता - या देशातील लोकांच्या सुरक्षेसाठी. आज मी माझी जमीन ओवाळून टाकीत आहे - मजुरांना काम मिळावं म्हणून! कारण त्यांच्याशी माझं भुकेचं नातं आहे ! पण या दाजिबासारखे घरभेदी - लोकांचे शत्रू आहेत, त्यांच्याविरूद्ध मात्र मी लढत राहीन. कारण तेही एका अर्थानं देशाचे शत्रूच आहेत. त्यांच्याविरूद्ध लढणं हा माझा धर्म आहे. मी लढत राहीन - हार - जितीची पर्वा न करता; कारण मी लढवय्या आहे साहेब, लढवय्या...!'

☐☐☐





लढवय्या / ३१