पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/30

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 आता दाजिबानं वेगळाच पवित्रा घेतला,

 ‘काय सांगू बाबानू, ह्यो महादू धेड... आन कलेक्टरबी त्येच्याच जातीचा - दोगे योक झाले! या नव्या आदेशापरमाने पाझर तलाव झाला तर सरकारचा खर्च जादा व्हईल, पन तेचा गावास्नी कायसुदिक फायदा व्हनार नाय. योक महादूची जिमीन सोडली तर गाववाल्याला कायबी फायदा नाय. उगीच आपुन बोरगावचं धन कामून करायचं?'

 ...आणि त्यानं आपली जमीन पाझर तलावासाठी देण्यासाठी नकार दिला, तेव्हा कलेक्टरांनी आपल्या अधिकाराचा वापर करून तातडीने जमिनीचे त्वरित अधिग्रहणाचे - रिक्विझिशनचे आदेश दिले. पण हिकमती दाजिबानं धावपळ करून हायकोर्टातून स्थगिती आदेश मिळवला.

 ‘पाहिलंत गावक-यांनो, इतरांनी जमीन द्यावी असं सांगणं किती सोप असत. पण आपल्यावर पाळी आली की कोर्टबाजी पण करायची. ह्या दाजिबाकडे शंभर सव्वाशे एकर जमीन आहे, त्याची दहा - पंधरा एकर जमीन गेली तर काय बिघडणार आहे? - पण नाही, तेव्हा मारे सांगत होता - गावासाठी, गावच्या विकासासाठी माणसानं त्याग करावा - मजुरांना काम मिळावं, त्यांचे हाल कमी व्हावेत म्हणून झीज सोसावी वगैरे वगैरे ! आता जा त्याच्याकडे व त्याला जाब विचारा...'

 महादूनं गावक-यांना सडेतोडपणानं सांगितलं. तेव्हा आधीच दुष्काळानं करपून गेलेले व हात रिकामे राहिल्यामुळे रिकाम्या पोटाचे मजूर भडकले. त्यांनी मोर्चाने जाऊन सरपंच दाजिबा पाटलाला जाब विचारला व पाझर तलावाचे काम होण्यासाठी त्यानं जमीन द्यावी, अशी मागणी केली.

 असा प्रसंग कधीतरी येऊ शकतो हे धूर्त दाजिबाला माहीत होतं व त्यासाठी त्यानं कावेबाजपणानं उपाययोजनाही करून ठेवली होती.

 ‘माझ्या गाववाल्यांनो - म्या जानतो की यामागे त्यो महादू हाय ते. तुम्हास्नी समजत नाही. बापहो, तुमचे हात आन पोटबी रिकामं हाय, हे सरपंच म्हनूनशानी मला वळखता येत नसेल तर म्या नालायक हाय असं म्हना लोक हो... म्या कोर्टात गेलो, पण कोर्टानं स्टे कामून दिला? इचार करण्याजोगी बाब ही. कोर्टाला वाटलं की, मह्यावर अन्याय झाला हाय... एवढं भारी हायकोर्ट

औरंगाबादचं. लई इचार करून स्टे दिला असेल नव्हं? आता, त्यो म्हादू जमीन द्याया खळखळ करतो? झूट - सम्दं झूट -! याचं योकच परमाण देतो - म्या दुसरं रोजगार हमीचं काम मंजूर करून आणलं हाय. सडकेचं हाय, त्यात माजी जिमीन जात हाय. ती जिमीन मी फुकट दिली हाय सरकारला दानपत्र करूनशानी...आता तुमीच न्याय कराया हवा मायबापहो. माजं मन साफ हाय. तुमास्नी काम मिळावं म्हनूनशानी हें सम्दं केलं. उद्यापासून सडकेचं काम सुरू होईल, चांगले दोन अडीच महिने साऱ्यांना काम मिळेल - तोवर मंग बरसात हुईल...'

पाणी! आणी!! / २८