पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/29

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

महादू हतबुद्ध होऊन परतला. परतताना त्याला दाजिबानं हलकेच टोकलंसुद्धा 'जरा इचार कर बाबा - गावापुढे कुनाचं चालतं ? तेस्नी काम पायजे. म्या तुजी भावना जाणतो - समदी जिमीन जाणं लई दुख देणारं हाय - पन कोशीश करून तुवास्नी जादा किंमत - जादा पैका मिळवून दीन ... पन संमती दे बाबा... उभ्या गावाशी दावा करून जगणं मुश्किल हाय....!'

 आता मात्र वेळ गमावून चालणार नव्हतं. काहीतरी केलंच पाहिजे. महादू विचार करीत होता. त्यानं सरळ कलेक्टरांना जाऊन भेटायचं ठरवलं.

 त्या दिवशी कलेक्टर घरीच होते. बरीच वाट पाहून महादूनं त्यांना घरीच जाऊन भेटायचं ठरवलं. कारण जिल्ह्याला एक चक्कर म्हणजे पन्नास रुपयांचा चुराडा व्हायचा. पुन्हा येणं अवघड व खर्चाचं होतं ! कलेक्टरांनी अनिच्छेनंच त्याला भेटायची परवानगी दिली.

 त्यानं कलेक्टरला एक कडक सॅल्यूट ठोकला.

 'अरे, तू सैन्यात होतास?'

 'होय सर, मी महार रेजिमेंटला होतो आणि एकाहत्तरच्या युद्धात मला वीरचक्र मिळालं आहे.'

 ‘म्हणजे तू लान्सनायक महादेव कांबळे ना?'

 ‘होय सर, पण तुम्हाला कसं माहीत?'

 'अरे मीही सैन्यात कमिशन घेतलं होतं. मीही मेजर होतो बाबा." पाहता पाहता कलेक्टर मोकळे झाले. त्या जिल्ह्यात वीरचक्र मिळवलेला महादू एकमेव होता, हे सैन्यात मेजर म्हणून काम केलेल्या व नंतर डेप्युटी कलेक्टर म्हणून भरती झालेल्या, पदोन्नतीनं आज या जिल्ह्यात कलेक्टर म्हणून आलेल्या त्यांना माहीत होतं ! 'बोल कांबळे, काय काम काढलंस?'

 ‘सर, माझ्यावर अन्याय झाला आहे, त्याविरुद्ध दाद मागायला आलो आहे. सर.' महादू म्हणाला, 'मी गावच्या सरपंचानं केलेल्या अन्यायाविरुद्ध लढत आहे. आपल्या आर्मीची शिकवण आहे - मी लढवय्या आहे सर.'

 'येस - येस् - वुई आर्मी पीपल आर ऑलवेज फायटर...' मला तुझी जिद्द आवडली कांबळे.

 महादूनं सारी हकीकत सांगितली, तसे कलेक्टर गंभीर झाले. “तू सांगतोस ते खरं असेल तर मी जरूर लक्ष घालतो. उद्याच मी माझ्या रोजगार हमीच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरला तपास करायला सांगतो, त्यांना गावी इन्स्पेक्शनला पाठवतो. तुझ्यावर खरोखर अन्याय झाला असेल तर तो निश्चितपणे दूर करीन मी!'

 कलेक्टरांनी आपला शब्द पाळला. महादू खराच होता, म्हणून त्याची जमीन बुडीत क्षेत्रात जाणा-या पाझर तलावाची जागा बदलून मूळ अलाईनमेंटप्रमाणे ज्यात दाजिबाची पंधरा एकर जमीन जात होती, या पाझर तलावाला मंजुरी देण्यात आली.


लढवय्या / २७